Meghalaya | मेघालयात संगमांना ४५ आमदारांचा पाठिंबा, उद्या शपथविधी, पीएम मोदी उपस्थित राहणार?

Meghalaya | मेघालयात संगमांना ४५ आमदारांचा पाठिंबा, उद्या शपथविधी, पीएम मोदी उपस्थित राहणार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : मेघालयात (Meghalaya) एनपीपीचे अध्यक्ष कॉनराड संगमा यांचा सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मेघालयातील प्रादेशिक पक्ष यूडीपी (UDP) आणि पीडीएफ (PDF) यांनी कोनराड संगमा यांच्या एनपीपी (NPP) नेतृत्वाखालील आघाडी सरकारला पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे आता संगमा यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांचे संख्याबळ ४५ झाले आहे.

शनिवारपर्यंत संगमा यांना भाजप आणि हिल स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (एचएसपीडीपी) च्या प्रत्येकी दोन आणि अपक्षांसह ३२ आमदारांचा पाठिंबा होता. आता यूडीपी आणि पीडीएफ ह्या दोन पक्षांच्या आमदारांनी संगमांना पाठिंबा दर्शवला आहे. तर चार आमदार असलेली न्यू व्हॉईस ऑफ पीपल्स पार्टी (व्हीपीपी) आणि प्रत्येकी पाच आमदार असलेले काँग्रेस आणि टीएमसी विरोधी बाकावर बसणार आहेत. दरम्यान, UDP ने संगमांना आपला पाठिंबा जाहीर करण्यास वेळ घेतला.

उद्या मंगळवारी कॉनराड संगमा मेघालयाच्या मुख्यमंत्रिपदाची सलग दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मोठे नेते सहभागी होण्याची शक्यता आहे. मंगळवारी सलग दुसऱ्यांदा शपथ घेण्यापूर्वी यूडीपीच्या पाठिंब्याने संगमा यांच्या आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे. पीडीएफचे अध्यक्ष गविन एम मायलीम आणि कार्याध्यक्ष बांतेइडोर लँगडोह यांनी संगमा यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या पाठिंब्याचे पत्र दिले आहे.

दरम्यान, आज ५९ सदस्यीय मेघालय विधानसभेची बैठक होणार आहे. यावेळी हंगामी विधानसभा अध्यक्ष आमदारांना शपथ देतील. दरम्यान, अध्यक्ष निवडीसाठी ९ मार्च रोजी पुन्हा सभागृहाची बैठक बोलावण्यात आली आहे. आघाडीचा भाग असल्याने भाजपनेही आपल्या दोन आमदारांची नावे मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी पाठवली आहेत.

मेघालयात कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेले नाही. संगमा यांचा पक्ष एनपीपीने आघाडी सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. यात एनपीपीचे २६, भाजपचे २, हिल स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे २, यूडीपीचे ११ आणि पीडीएफचे २ आमदार आहेत.
कोनराड संगमा यांचा पक्ष एनपीपीला राज्यात सर्वाधिक २६ जागा मिळाल्या आहेत. तर युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीला ११, काँग्रेस ५, तृणमूल काँग्रेस ५, भाजप २, हिल स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी २, पीडीएफ २, व्हीपीपी ४ आणि अपक्षांना २ जागा मिळाल्या आहेत. (Meghalaya) दरम्यान, एका जागेवरील उमेदवाराचा मृत्यू झाल्याने राज्‍यात ६० पैकी केवळ ५९ जागांवर नुकतीच निवडणूक पार पडली.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news