नवी दिल्ली; वृत्तसंस्था : ईशान्येकडील नागालँड आणि त्रिपुरा या विधानसभा निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवीत आपल्या विजयाचा डंका वाजवला आहे. मेघालयात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. तेथे 27 जागांसह कोनराड संगमा यांच्या नेतृत्वाखालील 'एनपीपी' हा सर्वात मोठा पक्ष बनला आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या धडाकेबाज कामगिरीबद्दल नागालँड, त्रिपुरा आणि मेघालयातील भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. या तिन्ही राज्यांत विधानसभेच्या प्रत्येकी 60 जागा आहेत. विशेषतः, नागालँड या ख्रिस्तीबहुल राज्यात भाजपने मिळवलेला धडाकेबाज विजय लक्षणीय मानला जात आहे. या राज्यात मुख्यमंत्री नेफियू रियो यांच्या नेतृत्वाखालील 'एनडीपीपी'ने 23 जागा जिंकल्या असून, भाजपने 12 जागांवर बाजी मारली आहे. दरम्यान, मेघालयमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने कोनराड संगमा यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.
विशेष म्हणजे, तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या जागा राखल्या आहेत. त्रिपुरामध्ये माणिक साहा हे नगर बारदोवली येथून, मेघालयातील दक्षिण तुरा जागेवरून कोनराड संगमा आणि नागालँडमधील कोहिमा येथील उत्तर अंगामी जागेवरून नेफियू रिओ विजयी झाले आहेत.
नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सात जागा जिंकल्या असून, तो दुसरा मोठा पक्ष बनला आहे. त्यामुळे त्याला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी थेट नागालँडमध्ये दोन आमदार निवडून आणले आहेत. टूएनसंद सदर – 2 विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार इम्तिचोबा आणि नोकसेन विधानसभा मतदारसंघातून वाय. लिया ओनेने चॅग हे विजयी झाले आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने आठ उमेदवार उभे केले होते.