गड्या आपली मराठी शाळाच बरी; इंग्लिश स्कूलच्या भूलभुलैयाला ग्रामीण भागात बाय-बाय!

गड्या आपली मराठी शाळाच बरी; इंग्लिश स्कूलच्या भूलभुलैयाला ग्रामीण भागात बाय-बाय!

नेकनूर, मनोज गव्हाणे : मागच्या काही वर्षात ग्रामीण भागात इंग्लिश स्कूलचे मोठ्या प्रमाणात फॅड आले होते. यामुळे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा ओस पडल्या. मात्र चौथीनंतर इंग्लिश स्कूल मधून पुन्हा मराठी शाळेत या मुलांना जावे लागत असल्याने या मुलांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे.

ग्रामीण भागातील घरात तसे वातावरण नसल्याने पालकांनी पुन्हा एकदा आपली मराठी शाळा बरी असा सूर आळवल्याने इंग्लिश स्कूलच्या दुकानदारीला फटका बसल्याचे चित्र यावर्षी दिसून येत आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी वेळेनुसार बदल करत स्मार्टपणा अंगीकारल्याने अनेक शाळा गजबजल्याचे दिसून येत आहे.

मागच्या सात वर्षात ग्रामीण भागातील पालकांना इंग्लिश स्कूलचे आकर्षण निर्माण झाले. विशिष्ट ड्रेस ,दारात मुलांना ने-आण करण्यासाठी गाडी नर्सरी, एलकेजी, युकेजी असे निर्माण झालेले वर्ग पालकांना मोहित करणारे ठरल्यामुळे घरात पूरक वातावरण नसतानाही अनेक पालक घराशेजारील जिल्हा परिषदेच्या मोफत शिक्षण देणाऱ्या शाळा सोडून पैसे खर्च करत इंग्लिश स्कूलच्या आहारी गेले मात्र याचे परिणाम मुलांसाठी नुकसानकारक ठरल्याने पुन्हा मराठी शाळांची वाट या मुलांना धरावी लागली.

चौथीनंतर बहुतांश इंग्लिश स्कूलकडे पुढचे वर्गच नाहीत त्यामुळे अनेक ठिकाणी या विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजीचा पर्याय घेत मराठी शाळेत यावे लागले त्यामुळे या विद्यार्थ्यांची इंग्लिश ही एक भाषा सोडली तर मातृभाषेत नुकसान झाल्याचे समोर आले. पुढच्यास ठेच मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे पालकांनी नंतरच्या मुलांसाठी मराठी शाळा हाच पर्याय ठेवत गड्या आपली मराठी शाळाच बरी म्हणत इंग्लिश स्कूलच्या भूलभुलय्ला भूलभुलैयाला दूर लोटल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसू लागले आहे.

इंग्लिश स्कूलच्या वाढत्या प्रभावाने ग्रामीण भागातील अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर होत्या. यामुळे जिल्हा परिषद शिक्षकांसाठी ही स्पर्धा आपले अस्तित्व टिकवण्यासाठी महत्त्वपूर्ण होती. यामुळे ग्रामीण भागातील अनेक शाळा ई- लर्निंग सोबत सेमी इंग्रजी असे प्रयोग राबवत भक्कम बनल्या. याचबरोबर युवा शिक्षकांनी स्मार्टपणा अंगीकारत कोरोना काळात विद्यार्थ्यांना मोबाईलच्या माध्यमातून धडे दिले. यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या शाळा या स्पर्धेत सरस ठरल्या आहेत. यामुळे प्रवेशाचा टक्काही वाढलेला दिसणार आहे.

हेही वाचा

मुलांच्या चांगल्या शिक्षणाच्या विचाराने मुलाला शेजारच्या मोठ्या गावात असणाऱ्या इंग्लिश स्कूलला पाठवले. मात्र तसे वातावरणच नसल्याने शिक्षणाचा ताळमेळ बसत नव्हता. मुलगा मातृभाषेतच मागे राहिल्याचे जाणवल्याने भवितव्यासाठी मराठी शाळाच महत्वपूर्ण वाटली जिल्हा परिषद शाळेत मुलाला प्रवेश दिला.

—सुभाष शिंदे ,पालक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news