पुढारी ऑनलाईन डेस्क : सगळे जण ज्याची आतुरतेने वाट बघत आहे, अशा सर्वांच्या आवडत्या गणपती बाप्पाचे आगमन लवकरच होणार आहे. (Ganesh Utsav) टीव्ही वाहिनीवर येत असलेल्या नवीन मालिकांमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपा परब, धनश्री काडगावकर , शिवानी नाईक आणि अभिनेता रोहित परशुराम यांनी आपआपल्या घरी गणेश उत्सव कसा साजरा केला जातो, याबद्दल आपल्या आठवणी व्यक्त केल्या आहेत. (Ganesh Utsav)
"तू चाल पुढं" या मालिकेत 'अश्विनीच्या' भूमिकेतून घराघरात पोचलेली अभिनेत्री दीपा परब सांगते- गणपती मला खूप प्रिय आहे. मी लोअर परळला राहायचे. माझ्या करिअरची सुरुवात गणेशोत्सवापासूनच झाली. या उत्सवातच कार्यक्रम करून मी माझ्या करिअरचा श्रीगणेशा केला. माझ्या घरी गणपती येत नाही. पण घरी देवघरातल्या गणपतीची मी मनोभावे पूजा करते. मोदक आणि पाच प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य त्याला असतो. यावर्षी मी 'तू चाल पुढं' या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा पदार्पण करत आहे ते सुद्धा या गणरायाच्या आशीर्वादानेच.
याच मालिकेतील 'शिल्पी' या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर आपल्या आठवणींविषयी सांगताना दिसते की," लहानपणापासून ते आतापर्यंत आमच्या घरी गणेश उत्सवाची दहा-पंधरा दिवस आधीपासूनच लगबग सुरु होते. माझ्या माहेरी गौरी गणपती असल्यामुळे सजावटीची तयारी करायची. सर्वांनी मिळून गणरायाला आणायचे. गणेश उत्सव दरम्यान मोदकांसह वेगवेगळे पदार्थ करायचे आणि आनंदाने संपूर्ण गणेश उत्सव साजरा करायचा. मी लहानपणी सोसायटीत साजऱ्या होणाऱ्या गणेश उत्सवातील स्पर्धांमध्ये भाग घेत असे. तिथूनच मला माझ्यातील कलाकाराची ओळख झाली असे मला वाटते. वेळ बदलत गेली. त्याप्रमाणे गणेश उत्सवाचे स्वरूपही बदलत गेले. परंतु, आताही मी बालपणीप्रमाणेच गणेश उत्सवाचा आनंद घेते.
'अप्पी आमची कलेक्टर' या नव्या मालिकेतील अभिनेत्री शिवानी नाईक म्हणजे अप्पी गणेश उत्सवाबद्दल भरभरून सांगते. गणरायाचे आगमन होणार या कल्पनेनेच खूप उत्साह निर्माण होतो. सगळेजण जोरात तयारीला लागतात. माझ्या घरी देव घरातच गणपतीची स्थापना होत असे. परंतु गेल्या वर्षीपासून अगदी व्यवस्थित सजावट करून गणपतीची स्थापना करतो. दुकानात जाऊन आपला गणपती शोधणे त्याला घरी घेऊन येत असतानाचा पायी प्रवास खूप आनंद देणारा असतो. घरी आल्यावर आई त्याचे अगदी प्रेमाने औक्षण करते. गणरायाला आवडणारे उकडीचे व तळणीचे मोदक तसेच अनेक गोडाचे पदार्थ करून गणपतीला नैवेद्य दाखवला जातो. या वर्षी मी एक दिवसासाठी का होईना घरी जाऊ नक्की बाप्पाला भेटून त्याचा आशीर्वाद घेणार आहे."
'अप्पी आमची कलेक्टर' ह्या मालिकेतील अभिनेता रोहित परशुराम म्हणजे अर्जुन आपल्या आठवण व्यक्त करताना सांगतो मला पाच वर्षाच्या महेनतीचं फळ या मालिकेच्या माध्यमातून मिळालं आहे. रोहित म्हणतो कि,"मी मूळचा भोरचा आहे, तिथे खूप दणक्यात गणेश उत्सव साजरा केला जातो. पूर्वी गणेश उत्सवात जिवंत देखावे निर्माण केले जात असत त्यात माझ्या भावाचाही सहभाग असायचा. मी लहानपणी मातीच्या नागपंचमीसाठी नाग, बैलपोळ्यासाठी बैल, तसेच गणेश उत्सवासाठी छोटी गणपती मूर्ती ही बनवायचो. ती फार सुबक नसली तरीही छान असायची. तो आनंद काही वेगळाच असायचा. गणपतीत मी बाप्पासोबत २१ मोदक सुद्धा खातो. लालबागच्या राजावर माझी नितांत श्रद्धा असून बाप्पाची माझ्यावर खूप कृपा आहे असे मला मनोमन वाटते. सगळ्यांना माझ्याकडून गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा."