सातारा : व्यावसायिक कर्जावरून केंद्रीय मंत्र्यांनी बँक अधिकार्‍यांना झापले | पुढारी

सातारा : व्यावसायिक कर्जावरून केंद्रीय मंत्र्यांनी बँक अधिकार्‍यांना झापले

सातारा;  पुढारी वृत्तसेवा : केंद्र शासनाकडून लघु उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे. यासाठी मुद्रा, एमएसएमई यासह अन्य विविध योजनातून व्यावसायिक कर्ज पुरवठा करण्याचे आदेश राष्ट्रीयकृत बँकांना दिले आहेत. रिझर्व बँकेने प्रत्येक जिल्ह्याला यासाठी उद्दिष्ट दिले आहे. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी किमान 15 हजार लघु उद्योजकांना कर्ज वाटप करावे, असे आदेश असताना जिल्ह्यात केवळ साडेचार हजार जणांना कर्जवाटप झाले आहे. ही बाब केंद्रीय मंत्री ना. सोमप्रकाश यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सर्व बँकांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची चांगलीच झाडाझडती घेतली. बँकांचे मेळावे घेवून प्रोत्साहन देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री ना. सोमप्रकाश यांनी केंद्रीय योजनाचा आढावा घेतला. या बैठकीस खा. श्रीनिवास पाटील, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, अतुल भोसले, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

पंतप्रधान ग्रामसडक योजना, पंतप्रधान किसान योजना, जलजीवन मिशन, स्वच्छ भारत, प्रधानमंत्री आवास योजना यासह अन्य योजनांबाबत ना. सोमप्रकाश अधिकार्‍यांना जाब विचारला. ना. सोमप्रकाश म्हणाले, प्रत्येक गरीब कुटुंबाला हक्काचे घर असणे महत्वाचे आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून गरीब कुटुंबाना पक्केघर मिळत आहे. या योजनेची जास्तीत जास्त प्रकरणे मंजूर करावीत. जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरात नळाने स्वच्छ पाणी मिळणार आहे. या योजनेची ग्रामीण भागात प्रभावी अमंलबजावणी करावी. जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी छोट्या छोट्या उद्योगांना बँकांनी वित्तीय पुरवठा करावा. यामुळे जिल्ह्यात रोजगार निर्माण होतील. शेतकर्‍यांना बँकांनी मोठ्या प्रमाणात पिक कर्ज द्यावे. योजना राबवताना लोकप्रतिनिधींचाही सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी जिल्ह्याची तसेच केंद्र शासनाच्या राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

सोमप्रकाशजी दर तीन महिन्यांनी या पण निधी घेऊन : खा. श्रीनिवास पाटील

बैठकीनंतर आभार मानताना खा. श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय मंत्री सोमप्रकाश यांना चिमटा काढला. ते म्हणाले, सोमप्रकाशजी दर तीन महिन्यांनी या पण सातारा जिल्ह्याला निधी घेवून या. खा. पाटील यांच्या या चिमट्याची जोरदार चर्चा सुरू होती.

Back to top button