वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा: मराठा आरक्षणासाठी अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या सतराव्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सरबत घेऊन, उपोषण सोडले असले तरी साखळी उपोषण सुरुच राहणार आहे. (Maratha andolan)
मराठा आरक्षणाबाबत सरकारने नियुक्त केलेल्या समितीला अहवाल देण्यासाठी वेळ लागणार आहे. तसेच सरकारला मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठीही काही अवधी लागत होता. सरकारने वेळोवेळी तशी विनंती केली होती. त्यानंतर काही अटी शर्तीच्या अधीन राहून मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले. त्यांनी एक महिन्याचा अवधी सरकारला दिला आहे. एक महिन्याचा वेळ देत असताना, शासनाकडे मनोज जरांगे यांनी एक अट ठेवली होती. उपोषण सुटेल परंतु, या ठिकाणी साखळी उपोषण हे सुरूच राहणार. जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत या ठिकाणी ठाण मांडून राहणार असल्याची भूमिका जरांगे यांनी घेतली होती. (Maratha andolan)
केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या शिष्ट मंडळा समोर त्यांनी सरकारला वेळ देतो, उपोषण सोडतो मात्र महिनाभर साखळी उपोषण सुरुच ठेवणार, अशी भूमिका ठेवली होती. ती सरकारने मान्य केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जरांगे यांनी उपोषण सोडले असले तरी साखळी उपोषण सुरुच राहणार असल्याने सरकारवर दबाव कायम राहणार आहे. (Maratha andolan)