कर्जत : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील कोपर्डी येथे ग्रामस्थांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण, आंदोलक लालासाहेब सुद्रिक यांची प्रकृती खालवल्याने स्थगित करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यांसह विविध मागण्यांसाठी हे उपोषण पाच दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले होते. उपोषणस्थळी वैद्यकीय अधिकारी शिंदे यांच्यासह डॉक्टरांचे पथक थांबून होते. प्रकृती खालावल्याने सुद्रिक यांना सलाईन लावण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती जास्त खालावली होती. त्यांची रक्तातील साखर कमी होऊन, रक्तदाबही वाढत होता. सर्व तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी पत्र देऊन लालासाहेब सुद्रिक यांना कर्जत उपजिल्हा रुग्णालयात न्यावे अशी शिफारस केली.
दरम्यान, त्रास जास्त होऊ लागल्यामुळे शनिवारी मध्यरात्री पोलिस उपअघीक्षक विवेकानंद वाकचौरे, निरीक्षक घनश्याम बळप यांनी आंदोलकांशी चर्चा केली. उपोषणाबाबत वरिष्ठांना वेळोवेळी सर्व माहिती कळवली आहे, त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत सर्व पत्रव्यवहार केला आहे, असे आंदोलकांना सांगितले आणि आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर ग्रामस्थांची बैठक होऊन आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलिस अधिकार्यांच्या हस्ते पाणी देऊन सुद्रिक यांचे आंदोलन स्थगित करण्यात आले.