नगर : पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याने मित्राचा खून

नगर : पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याने मित्राचा खून

पुढारी : नगर वृत्तसेवा : पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याच्या रागातून दोघांनी मिळून एकाचा खून केल्याची घटना घडली आहे. नगर तालुक्यातील चास येथील फलके फार्म हाऊसच्या पाठीमागे मंगळवारी दुपारी ही घटना घडली. या संदर्भात नगर तालुका पोलिस ठाण्यात बुधवारी दुपारी उशिरापर्यत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

हनुमंत नरसू गायकवाड (वय 24) आणि सुरज लक्ष्मण मोरे (वय 22, दोघे रा. बाबुर्डी घुमट, ता. जि. अहमदनगर) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. तर राहुल कनका मोरे (वय 19, रा. बाबुर्डी घुमट, ता. जि. अहमदनगर) असे मयताचे नाव आहे.

मंगळवार दि. 12 जुलै रोजी दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान आरोपी आणि मयत यांच्यामध्ये वाद झाले होते. यावेळी मयत राहुल मोरे याने आरोपी सुरज मोरे याच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरले. या रागातून आरोपी हनुमंत गायकवाड आणि सुरज मोरे यांनी दोरीने गळा आवळून राहुल मोरे याचा खून केला. यानंतर आरोपींनी मृतदेह त्याठिकाणीच ठेवला होता.

बुधवारी सकाळीच आरोपी हनुमंत गायकवाड याने शहरातील कोतवाली पोलिस ठाणे गाठत खून केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कोतवाली पोलिसांनी आरोपी गायकवाड याच्याकडे घटनेबाबत अधिक चौकशी केली असता चास शिवारातील फलके फार्म हाऊसच्या मागे घटना घडल्याचे सांगितले. कोतवाली पोलिसांनी नगर तालुका पोलिसांना यासंदर्भात माहिती देत आरोपी गायकवाडसह घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी सुरज मोरे याला नगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले.

नगर तालुका पोलिसांनी राहुल मोरे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविला आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात भादंवि. कलम 302, 120 (ब), 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारी दुपारी उशिरापर्यत सुरू होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news