Sri Lanka crisis : राष्ट्रपती देश सोडून पळून गेल्यानंतर श्रीलंकेत आणीबाणी जाहीर

Sri Lanka crisis : राष्ट्रपती देश सोडून पळून गेल्यानंतर श्रीलंकेत आणीबाणी जाहीर
Published on
Updated on

कोलंबो; पुढारी ऑनलाईन : श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे देश सोडून गेल्यानंतर श्रीलंकेत आणीबाणी (state of emergency)  जाहीर करण्यात आली आहे. देशात आणीबाणी जाहीर केली असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. राष्ट्रपती देश सोडून गेल्यानंतर श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून आणीबाणी घोषित केल्याचे वृत्त Reuters आणि AFP ने दिले आहे.

राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देशातून पलायन केल्यानंतर काही वेळानंतर हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी संसद आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे मोर्चा वळवला. अन्न आणि इंधनाची तीव्र टंचाई निर्माण झालेल्या विनाशकारी आर्थिक संकटात राष्ट्रपती देश सोडून मालदीवमध्ये गेले आहेत. त्यानंतर आंदोलकांना श्रीलंकेच्या पंतप्रधानांच्या कार्यालयावर हल्ला केला. यामुळे येथील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. आज कोलंबोमधील पंतप्रधान कार्यालयावर धडक देणाऱ्या हजारो आंदोलकांना रोखण्यासाठी लष्करी जवानांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी अखेर देश सोडला आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे हवाई दलाच्या विमानाने देश सोडून निघून गेले आहे. गोटाबाया राजपक्षे, त्यांची पत्नी आणि दोन अंगरक्षकांसह मालदीवची राजधानी माले येथे दाखल झाले आहेत.

श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना मालदीवला जाण्यास इमिग्रेशनसाठी संरक्षण मंत्रालय, सीमाशुल्क विभागाकडून परवानगी देण्यात आली होती. १३ जुलैच्या पहाटे त्यांना हवाई दलाचे विमान उपलब्ध करुन देण्यात आले, अशी माहिती श्रीलंकन हवाई दलाच्या मीडिया संचालकांनी सांगितले. दरम्यान, वेलाना विमानतळावर मालदीव सरकारच्या प्रतिनिधीने त्यांचे स्वागत केल्याचे समजते.

"राष्ट्रपती पळून गेल्याचा मला आनंद नाही. ते तुरुंगात असायला हवे होते, " असे राष्ट्रपती कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या २५ वर्षीय आंदोलक मलिक डिसूझा यांनी म्हटले आहे. ते गेल्या ९७ दिवसांपासून आंदोलनात सक्रिय आहेत. राजपक्षे यांनी देश उद्ध्वस्त केला आणि आमचा पैसा चोरला. आम्हाला नवीन राष्ट्रपती आणि पंतप्रधान मिळेपर्यंत आमचे आंदोलन थांबणार नाही," असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

श्रीलंकेत गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या आर्थिक आणि राजकीय संकटात राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे हे देश सोडून गेले आहेत. दरम्यान, गोटाबाया यांनी अधिकृतरीत्या राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. याबाबत त्यांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना माहिती दिली आहे. राष्ट्रपती घोषणेनुसार राजीनामा देतील, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. राष्ट्रपती भवनातील पहिल्या मजल्यावर लाकडी कपाटासमोर गुप्‍त बंकरचा व्हिडीओ समोर आला होता. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे याच मार्गाद्वारे राष्ट्रपती निवासस्थानातून बाहेर पडल्याचे सांगितले जात आहे.

जोपर्यंत राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे राजीनामा देणार नाहीत, तोपर्यंत आंदोलक राष्ट्रपती भवनातच ठाण मांडून राहणार आहेत, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. राष्ट्रपती भवनात आंदोलकांनी मौजमजा केल्याची छायाचित्रे, व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
श्रीलंकेतील राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवलेल्या आंदोलकांनी या निवासस्थानी चांगलीच मौजमजा केली. अजूनही ही मौज सुरू आहे आणि त्याचे फोटोज, व्हिडीओजही जगभर व्हायरल झाले आहेत. यात काही लोक राष्ट्रपती भवनातील स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा, डुंबण्याचा आनंद घेताना दिसत आहेत.

जगभरात यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी चक्क राष्ट्रपतींच्या खुर्चीवर बसून फोटो काढले, तर काही आंदोलक येथील शाही किचनमध्ये जेवतानाही दिसत आहेत. काही जणांनी राष्ट्रपतींच्या शयनकक्षातील बेडवर विश्रांतीचा आनंदही घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news