बारामती : पुढारी वृत्तसेवा
वडगाव निंबाळकर येथे निवृत्त इसमाकडील दीड लाखांचे दागिने लुटणाऱ्या ज्येष्ठाला वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली आहे. अबालू जाफर इराणी (रा. शिवाजीनगर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी तीन तोळ्यांचे दीड लाख रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले आहेत.
वडगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी याबाबत माहिती दिली. दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास वडगामधील एक निवृत्त व्यक्ती फेरफटका मारत असताना एकाने पोलिस असल्याची बतावणी करत त्यांना अंगावरील दागिने रुमालात बांधून ठेवण्यास सांगितले होते. यावेळी हातचलाखी करत त्याने हे दागिने लंपास केले होते.
या गुन्ह्यात वडगाव पोलिसांनी आरोपीच्या वर्णनावरून तो कोणत्या दिशेने फरार झाला असेल, याचा अंदाज बांधत सासवडपर्यंतचे सीसीटीव्ही कॅमेरे पडताळले होते. त्याचे चित्रीकरण आणि गोपनीय माहितीच्या आधारे इराणी याला अटक करण्यात आली. तो घटनेनंतर परराज्यात पसार झाला होता. कराड शहर पोलिसांनी तेथे दाखल गुन्ह्यात त्याला अटक केली होती. त्याच्याकडून वडगाव पोलिसांनी त्याचा ताबा घेतला. फसवणूक घेतलेले दीड लाखांचे दागिने मिळविले. ही कामगिरी लांडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके, हवालदार महेंद्र फणसे, सागर चौधरी, ज्ञानेश्वर सानप, कुंडलिक कडवळे, पोपट नाळे, अमोल भुजबळ, विलास ओमासे, राहूल होळकर यांनी केली.
वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केलेल्या इराणी याच्यावर राज्यभरातील विविध पोलिस ठाण्यात तब्बल १५ गुन्हे दाखल आहेत. तो सराईत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली.