पुढारी ऑनलाईन डेस्क : 'मन धागा धागा जोडते नवा' मालिका ८ मे पासून सुरु होणार आहे. या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. घटस्फोट अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मालिकेतून भाष्य केलं जाणार आहे. घटस्फोटित महिलांकडे लोकांचा पहाण्याचा दृष्टीकोन नेहमीच वेगळा असतो. समाज तर सोडाच पण घरच्यांकडूनही त्यांना खंबीर साथ मिळत नाही. आनंदीही त्यापैकीच एक. जगण्यातला सूर हरवलेल्या मात्र तरीही आनंदात रहाण्यासाठी धडपडणाऱ्या आनंदीची गोष्ट या नव्या मालिकेतून मांडण्यात येणार आहे.
मुलगी झाली हो मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दिव्या पुगावकर आनंदी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. अभिनेता अभिषेक रहाळकर या मालिकेत सार्थकच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. स्वत:ला कामात सतत गुंतवून घेणारा आणि प्रसन्न व्यक्तिमत्व असणारा असा हा सार्थक. काकांच्या निधनानंतर आणि वडील आजारी पडल्यानंतर सार्थकने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेतली. त्याला त्याच्या जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे. सार्थकच्या रुपात आनंदीच्या आयुष्यात नवा आशेचा किरण येईल.
या भूमिकेविषयी सांगताना अभिनेता अभिषेक रहाळकर म्हणाला, 'स्वत:पेक्षा कुटुंबावर प्रेम करणारा आणि सतत कामाचा विचार करणारा सार्थक मी साकारतोय. ही भूमिका साकारताना खूप नव्या गोष्टी शिकायला मिळत आहेत. मी मुळचा नाशिकचा. मालिकेची गोष्टही नाशिकमधली दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे ही मालिका माझ्यासाठी खूप खास आहे. मला लहानपणापासूनच कलेची आवड होती. वकृत्व स्पर्धा असो, पाठांतर स्पर्धा असो मी आवर्जून भाग घ्यायचो. आईने मला खूप प्रोत्साहन दिलं. चार लोकांसमोर उभं राहून आत्मविश्वासाने बोलता यायला हवं असा तिचा आग्रह असायचा. या स्पर्धांमधूनच अभिनयाची आवड वाढत गेली.'
'शाळा आणि कॉलेजमध्ये मग नाट्यस्पर्धेत भाग घ्यायचो. घरात कुणीही अभिनय क्षेत्रात नसल्यामुळे या क्षेत्राविषयी फार माहिती नव्हती. मनापासून जे करायचं आहे तेच करु हे मी मनाशी पक्क ठरवलं होतं. अभिनयाच्या वेडापायीच मी मुंबई गाठली आणि मालिकांमध्ये छोट्या छोट्या भूमिका साकारल्या. मन धागा धागा जोडते नवा मालिकेतलं सार्थक हे पात्र प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची खात्री आहे.'