पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाची धुव्वाधार बॅटिंग सुरू असून, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर गेल्या चोवीस तासांत राज्यातील बहुतांश भागात 100 मिमीच्या आसपास पाऊस पडला आहे. दरम्यान, 30 सप्टेंबरपर्यंत मुसळधारचा जोर कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
उत्तर कर्नाटक किनारपट्टीपासून ते दक्षिण छत्तीसगडपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत आहे. हे क्षेत्र उत्तर कर्नाटक (अंतर्गत भाग) तेलंगणा, विदर्भ पार करून पुढे गेले आहे. त्याचबरोबर या क्षेत्राचा प्रभाव कायम आहे. याशिवाय उत्तर कर्नाटकवर एक चक्रीय स्थिती आहे. तसेच दक्षिण छत्तीसगड भागावर चक्रीय स्थिती आहे. यामुळे राज्याच्या सर्वच भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू असून, अजून किमान 30 सप्टेंबरपर्यंत सुरूच राहणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे कमाल तापमानात वाढ झाली होती. मात्र, कमी दाबाचे पट्टे, तसेच इतर पूरक स्थितीमुळे राज्यात पावसाने जोर धरला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या भागांत पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा जोर राहणार आहे. विशेषत: घाट माथ्यावर पाऊस अतिमुसळधार बरसणार आहे. कोकण, विदर्भातदेखील पाऊस जोरदार राहणार आहे. तर, मराठवाड्यातील काही भागांतही मुसळधार बरसणार आहे.
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे (घाटमाथा)
हेही वाचा