Pune Ganeshotsav 2023 : खरंच यंदा वेळेत संपेल मिरवणूक? | पुढारी

Pune Ganeshotsav 2023 : खरंच यंदा वेळेत संपेल मिरवणूक?

सुनील माळी

पुणे : ‘मिरवणुकीत वेळेवर सहभागी होणार अन् ती वेळेत संपवणार’ हे मानाच्या पहिल्या आणि शेवटच्या मंडळांनी दिलेले आश्वासन, त्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीने तर मध्यरात्रीच्या नेहमीच्या वेळेच्या किमान दहा तास आधी म्हणजे चक्क संध्याकाळी चार वाजता मिरवणुकीत येण्याची केलेली घोषणा तसेच ‘जागेवर निर्णय घेऊन मिरवणुकीचा विलंब टाळू’ असे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांचे सूतोवाच… ऐकायला बरे वाटतेय, पण तमाम पुणेकरांचा एकच प्रश्न… ही आश्वासने प्रत्यक्षात येणार आहेत का, नेहमीप्रमाणेच ‘बोलाची कढी अन् बोलाचाच भात’ होणार आहे का?

याचं उत्तर मिळेल येत्या चोवीस तासांत. अर्थात, हे शक्य होईलही. कसं ? पुण्याच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत ज्यानं-ज्यानं गेली काही दशकं डोळे उघडे ठेवून भाग घेतलाय, पायात गोळे येईपर्यंत मिरवणुकीचे सर्व मार्ग उभे-आडवे फिरले आहेत असा कुणीही सांगू शकेल.

… जर ग्रामदैवत कसबा, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा हे पाचही पहिले मानाचे गणपती संध्याकाळी साडेपाचपर्यंत लक्ष्मी रस्त्यावरून अलका चित्रगृहाजवळचा टिळक चौक ओलांडून गेले,… जर खरोखरीच दगडूशेठ गणपती चारला लक्ष्मी रस्त्यावरच्या बेलबाग चौकात येऊन मुख्य मिरवणुकीत सहभागी झाला,… जर शेवटच्या मंडळांपैकी जिलब्या, बाबू गेनू या महत्त्वाच्या आणि भाऊसाहेब रंगारी, अखिल मंडई या मानाच्या मंडळांनी ठरवलेल्या वेळेनुसार पोलिसांनी त्यांना बेलबाग चौकात यायची वाट करून दिली… जर त्यानुसार मंडई गणपती मध्यरात्रीपर्यंत विसर्जित झाला… तर आणि तरच त्यानंतरची मंडळे वेगाने पुढे येऊन सूर्योदय होईपर्यंत मिरवणूक संपू शकेल…

… हा खरं तर जर-तरचा खेळ आहे, पण तरीही तो होऊ शकतो. बहुतांश मंडळांची आरास रात्र असेपर्यंतच पाहण्याचा आनंद लुटण्याची लाखो पुणेकरांची इच्छा पुरी होऊ शकते. त्या लाखो जणांना वेठीला न धरता, त्रास न देता मिरवणूक वेळेत संपवण्याचा वर्षानुवर्षे करण्यात येणारा निर्धार प्रत्यक्षात येऊ शकतो.

… अर्थात, यात अडचणी काय-काय येऊ शकतात ? एकतर मानाच्या पाच गणपतींना अपेक्षेपेक्षा दोन-तीन तास जादा लागले, दगडूशेठ गणपती चारला जागेवरून निघाला तरी पाचपर्यंत बेलबाग चौकात पोहोचूच शकला नाही, शेवटच्या महत्त्वाच्या अन् मानाच्या मंडळांना पोलिसांनी वाट करूनच दिली नाही किंवा इतर मंडळांच्या दबावाने त्यांना ती देताच आली नाही… तर हे सगळे फसू शकते अन् पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ म्हणत अठ्ठावीस, तीस, बत्तीस तासांची मिरवणूक असे मथळे वृत्तपत्रांना द्यावे लागतील. लक्ष्मी रस्त्यावरची मिरवणूक ही मुख्य मिरवणूक. या रस्त्यावरून आपला गणपती वाजत-गाजत न्यायचा अन् लाखो पुणेकरांनी तो पाहायचा अशी इच्छा स्वाभाविकच बहुतांश मंडळांची असते. अर्थात, वेळेच्या अन् इतर बंधनांमुळे प्रत्येक मंडळाला लक्ष्मी रस्त्यावरून जायला मिळत नाही.

त्यामुळेच पर्यायी रस्ते करण्यात आलेत. लक्ष्मी रस्त्यावर येण्यासाठी शिवाजी रस्त्यावर गणपतींच्या गाड्यांच्या रांगा लागलेल्या असतात. ते गणपती लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकात येऊन तिथे मुख्य मिरवणुकीत सहभागी होतात. लक्ष्मी रस्त्यावरील रांग सिटी पोस्टाकडून सोन्या मारुती चौकाच्या दिशेने अगदी नाना पेठेपर्यंत गेलेली असते. मग शिवाजी रस्त्याने येणार्‍या पाच गणपतींना बेलबाग चौकात येऊ दिल्यावर ती रांग थांबवून सोन्या मारुती चौकाकडील रांगेतल्या पाच गणपतींना बेलबाग चौकात येऊ दिले जाते.

या मार्गावरचे पाच आणि नंतर त्या मार्गावरचे पाच या क्रमाने गणपती सोडले जातात. हा क्रम थांबवून बाबु गेनू चौकातून येणार्‍या शेवटच्या मानाच्या गणपतींना वेळेआधी नव्हे, तर वेळेवर सोडण्याचा खंबीरपणा पोलिस दाखवणार का, दोन मंडळांत अंतर पडले तर समजुतीनं, काही वेळा थोडं दटावत ते कमी करण्याचा प्रयत्न पोलिस करणार का, त्यासाठी त्यांना शासकीय अभय-पाठिंबा मिळणार का, या प्रश्नांच्या उत्तरावर मिरवणूक वेळेवर संपणार का रखडणार, ते अवलंबून राहील. याचाच अर्थ, पुण्यातील विसर्जन मिरवणूक वेळेत संपवणे नेमकं कुणाच्या हाती आहे, ते वाचकांना (जाणत्या, चाणाक्ष इत्यादी) समजलंच असेल.

पुण्याची विसर्जन मिरवणूक हा आता खरंतर चर्चा करणं थांबवावी, असा विषय आहे. कितीही प्रयत्न केले तरी या मिरवणुकीला शिस्त लागत नाही, ती तासन्तास पसरत जाते. उत्सवात राबणारे कार्यकर्ते वेगळे आणि मिरवणुकीत नाचणारे वेगळे असतात. ‘मंडळाला नाचण्यासाठी कार्यकर्ते हवेत’, ही गेले काही दिवस व्हायरल होणारी छोटी जाहिरात बरेच काही सांगून जाते. गणेशोत्सवाचं हे एकशे एकतिसावं वर्ष. त्यातल्या उत्सवाच्या दुसर्‍याच वर्षी म्हणजे 1894 मध्ये शंभर गणपती बसले आणि दुपारी 2 ला निघालेली मिरवणूक दिवेलागणीला म्हणजेच संध्याकाळी 6 पर्यंत म्हणजेच चार तासांत संपली होती. पुढील वर्षांत तीन, चार, सहा, नऊ, दहा, बारा, सोळा, अठरा, एकवीस, बावीस, तेवीस अशी वाढता वाढता 1987 मध्ये ती चोवीस तासांवर पोचली.

त्यानंतर मात्र अपवाद वगळता ती चोवीसपेक्षा अधिकच तास होत राहिली. 2005 मध्ये तर तिने आतापर्यंत अबाधित असलेला विक्रम नोंदवला तो तब्बल 33 तास 20 मिनिटांचा. गेल्या म्हणजेच 2022 मध्ये तिला 31 तास 33 मिनिटे लागली. (पोलिस, कार्यकर्ते, पत्रकार यांच्या गेल्या वर्षीच्या नोंदीमध्ये विसंगती आढळते.) मिरवणुकीला वेळ लागण्यामागे केवळ मंडळांची वाढती संख्या हेच कारण नाही. उलट, मुख्य लक्ष्मी रस्त्यावरील गणपतींची संख्या काही वेळा घटली, तर प्रदीर्घ काळ बर्‍यापैकी स्थिर राहिली. तसेच टिळक रस्त्यासारख्या 1990 पासून सुरू झालेल्या मिरवणुकीतील गणपतींची संख्या लक्ष्मी रस्त्यापेक्षा अधिक झाल्याचेही प्रकार घडले होते.

मोठ्या मंडळांची अवाजवी पथकसंख्या, ढोलताशा पथकातील तब्बल सत्तरीपर्यंत गेलेले ढोल अन् जवळपास प्रत्येक चौकात स्थिरवादनाचा झालेला आग्रह, दोन मंडळांतील अंतर कमी करण्यासाठीच्या प्रयत्नांचा पोलिस-कार्यंकर्त्यांकडून अभाव, लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाची चणचण, मानाच्या मंडळांना वेळेत मिरवणुकीमध्ये सहभागी करून घेण्यात आलेले प्रशासकीय अपयश, ’फारसे निर्बंध ठेवू नका’, असा वरून आलेला तोंडी आदेश, कोथरूड-वडारवाडी यांसारख्या उपनगरांतील मंडळांनी 1996 पासून सुरू झालेल्या कर्वे रस्त्यासारख्या नव्या मार्गावरून न जाता परंपरेने मुख्य मिरवणुकीतूनच जाण्याचा केलेला हट्ट, डीजेच्या उडत्या आणि छाती दडपून टाकणार्‍या आवाजावर प्रदीर्घ काळ थिरकणारी तरुणाई… अशी अनेक कारणे आहेत.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीला मुख्य मिरवणूक म्हणणे सोडून दिले पाहिजे. ती मुख्य म्हणजे बाकी सगळे मार्ग गौण, मग ’मुख्य मिरवणुकीतच आमचा गणपती हवा’, असा हट्ट येतो. टिळक, केळकर, कुमठेकर या रस्त्यांवर पर्यायी आकर्षणे तयार करण्यात आपण अपयशी ठरलो. त्याकडे पोलिस, राजकीय नेते, मंडळे या सर्वांनीच दुर्लक्ष केले. टिळक रस्त्यावरच्या महापालिकेच्या मांडवात नाना पाटेकरसारखा प्रसिद्धीवलय म्हणजेच ग्लँमर असलेला अभिनेता किंवा तत्सम त्या त्या काळात प्रसिद्धीवलय असलेली अभिनेत्री मंडळांच्या स्वागताला उपस्थित ठेवता आले असते. महापौर-खासदार-मंत्री टिळक चौकातच बसून न राहता आलटून पालटून या दुसर्‍या रस्त्यांवरही गेले असते आणि त्या रस्त्यावरच्या मंडळांना टिळक चौकापर्यंत आणण्याचा हट्ट सोडून त्याआधीच त्यांना वळवले असते तर ?

… पण हे करणार कोण ?

त्यासाठीच तर शहराला नेतृत्व लागते आणि आज त्याचीच भीषण पोकळी आहे.

Back to top button