पुढारी ऑनलाईन : केंद्रीय निवडणूक आयोग आता सरकारच्या हातातले बाहुले झाले आहे, अशी सर्वसामान्य जनतेत चर्चा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात विरोधी पक्षांनी पक्ष आणि चिन्ह कोणाचे यासंदर्भात आयोगाकडे नाही, तर लोकांमध्ये जाऊन नवा पक्ष, चिन्हाची नव्याने सुरूवात करावी. हाच आता एकमेव मार्ग आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी म्हटले आहे.
आमदार रोहित पवार यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, केंद्र सरकारने निवडणूक आयुक्त निवडीच्या समितीतून सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या विधेयकाच्या माध्यमातून निवडणूक आयोग हे केंद्र सरकारच्या हातातील बाहुले आहे, या लोकांच्यात सुरू असलेल्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे. विरोधी पक्षांत फोडाफोडी करून ती दुर्बल बनवण्याच्या प्रक्रियेला गती देणे हाच या विधेयकाचा उद्देश असल्याचे देखील रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विटमधून स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी येणाऱ्या काळात पक्ष आणि चिन्ह कोणाचे यासंर्भात दाद मागण्यासाठी निवडणूक आयोगाकडे जाणे म्हणजे वेळ व्यर्थ घालवण्यासारखे आहे. म्हणून विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे न जाता लोकांमध्ये जाऊन नवीन पक्षाची नवीन चिन्हासह नवी सुरूवात करणे हा एकमेव पर्याय राहील, याच कुठही शंका नसल्याचे म्हणत रोहित पवार यांनी ट्विटरवरून सध्याच्या सरकारच्या धोरणांचा समाचार (Rohit Pawar) घेतला आहे.