पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा राज्यभरात सुरू आहे. अजित पवार भाजपसोबत युती करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची जागा घेण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे. भाजपसोबत जाण्यासाठी अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या ५३ पैकी सुमारे ४० आमदारांनी पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीच्या या आमदारांनी अजित पवार यांना त्यांची संमती असल्याच्या सह्या दिल्या आहेत. योग्य वेळ आल्यावर ही यादी राज्यपालांना सादर केली जाईल, असे वृत्त द न्यू इंडियन एक्स्प्रेसने राष्ट्रवादी पक्षातील सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
"आतापर्यंत राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांनी अजित पवार यांना पाठिंब्यासाठी सह्या दिल्या आहेत. वेळ आल्यावर ही यादी राज्यपालांना सादर केली जाईल," असे सूत्रांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बंड करणारे शिवसेनेचे आमदार सर्वोच्च न्यायालयाकडून अपात्र ठरतील, असे गृहीत धरून सत्ताबदलाच्या हालचाल्या सुरु असल्याचे पुढे वृत्तात नमूद केले आहे.
मात्र या राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मौन बाळगले आहे. अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांना त्यांच्या सह्या घेण्यासाठी वैयक्तिकरित्या बोलावत असताना शरद पवारांनी अद्याप यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात येण्यापूर्वी २०१९ मध्ये एका पहाटे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेत सरकार स्थापन केले होते. पण हे सरकार अधिक काळ तग धरू शकले नाही. त्यानंतर शरद पवार यांनी आपला पक्ष अबाधित ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना माघारी बोलावले होते.
"अजित पवारांकडून राजकीय हालचाली वेगाने सुरु असताना शरद पवार यांनी अद्याप फोन केला नाही, याचेच आम्हाला आश्चर्य वाटते," असे सूत्रांनी सांगितले. पण शेवटच्या क्षणी हस्तक्षेप करुन ते निर्णय बदलू शकतात. अजित पवार यांनी पुण्यातील नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत आणि त्याच्या जवळच्या विश्वासूंसोबत चर्चा सुरू ठेवण्यासाठी ते मुंबईत थांबले असल्याचे समजते.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले अपक्ष आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर टर्निंग पॉईंट मिळेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी अथवा कर्नाटक निवडणुकीपूर्वी शिंदे यांना पायउतार व्हावे लागले तर भाजप पर्यायी मार्गाचा विचार करत आहे.
"काही कायदेतज्ज्ञांनी सल्ला दिला आहे की हा राजकीय बदल सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी व्हायला हवा. तर्क असा आहे की जर अजित पवार यांनी निकालापूर्वी शपथ घेतली, तर नवीन सरकार पडणार नाही अथवा भाजपचे संभाव्य नुकसान होणार नाही. राजकीय घडामोडी पुढे मागे होत आहेत. आता अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे," असे भाजपमधील एका सूत्राने सांगितले.
शरद पवार यांच्या विश्वासातील राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठ आमदारही अजित पवारांच्या सत्ताबदलाला पाठिंबा देत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान. सध्याच्या राजकीय घडामोडीवर अजित पवार यांनी खुलासा केला आहे. माझ्याबद्दल ज्या काही नाराज असल्याच्या बातम्या जाणीवपूर्वक वेगवेगळ्या ठिकाणी चालविल्या जात आहेत. त्यामध्ये काहीही तथ्य नाही, असा खुलासा अजित पवार यांनी आज विधान भवनात पत्रकार परिषदेत केला. सकाळपासून अजित पवार हे नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केल्यानं राजकीय तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला.
कारण नसताना माझ्याबद्दल गैरसमज पसरविले जात आहेत. माझ्या सहकाऱ्यांबद्दलही गैरसमज पसरविले जात आहेत. ४० आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत. मी राष्ट्रवादीतच राहणार आहे. भाजपसोबत जाण्याबाबतच्या चर्चा निराधार आहेत अस त्यांनी सांगितलं.
हे ही वाचा :