बीड : पुढारी वृत्तसेवा; विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत घरोबा करणार असल्याची चर्चा सुरु असतानाच अचानक राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे नॉट रिचेबल झाले आहेत. ते मुंबईत आल्याचे समजते. त्यांचे दोन्ही फोन स्विच ऑफ असल्याचे सांगण्यात येत आहे. अजित पवारांसोबत मुंडे देखील जात आहेत की काय? अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात गेल्याचीही माहिती मिळत आहे. (Maharashtra Political Crisis)
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी परळीतून आणि धनंजय मुंडे यांनी गंगाखेड मधून निवडणूक लढवावी यावर उभयतांचे एकमत झाले असून तत्पूर्वी धनंजय मुंडे पक्षांतराचा निर्णय घेतील अशी बीड जिल्ह्यात चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे नॉट रिचेबल होण्याच्या घटनेला वेगळे महत्त्व आले आहे.
अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा राज्यभरात सुरू आहे. पवार यांच्या हा भूमिकेला पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी विधासनभेचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी पाठिंबा दर्शविला आहे. अजित पवार जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल. ते जिथे जातील तिथे आम्ही जाऊ, असे सांगत त्यांनी पवार यांच्याबाबत जाहीर भूमिका घेतली आहे. इतर काही आमदारांनीदेखील अशीच भूमिका घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या भूमिकेवरून तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. ३५ ते ४० आमदारांसह अजित पवार हे भाजपसोबत जाणार, अमित शहांची भेट घेतली, जागावाटपही ठरल्याच्या बातमीने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांचा बाजार गरम झाला आहे. या चर्चांवर खुद्द अजित पवार यांनीच खुलासा करण्याची मागणी ठाकरे गट, काँग्रेसकडून करण्यात आली. तर शरद पवारांच्या मूक संमतीनेच ही फूट पडणार असल्याचा दावा शिंदे गटाने केला. त्यातच येत्या १५ दिवसांत दोन राजकीय स्फोट होणार असल्याचे विधान करत प्रकाश आंबेडकर यांनी भर घातली.
अजित पवारांसह काही आमदार नॉट रिचेबल झाल्याच्या बातम्या ८ एप्रिलला आल्या होत्या. त्यावर आजारी होतो, असा खुलासा अजित पवारांनी केला होता. मात्र ८ तारखेला अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकारातून ही भेट घडली. खा. सुनील तटकरेही यावेळी उपस्थित होते. या भेटीत जागावाटपावरही शिक्कामोर्तब झाल्याचा दावा या बातमीत करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. तर अजित पवारांना भाजपबरोबर जात मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. अजित पवारांना राष्ट्रवादीच्या ३५ ते ४० आमदारांचा पाठिंबाही आहे. पण शरद पवार भाजपबरोबर जाण्यास इच्छुक नसल्याचे या वृत्तात म्हटले आहे. (Maharashtra Political Crisis)
अजित पवार हे दिल्लीत जाऊन अमित शहांना भेटले की नाही, हे त्यांनाच विचारावे लागेल. तशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पण मुळात भेटले का नाही, याचे कोणीतरी खात्रीलायक स्पष्टीकरण दिले पाहिजे. त्यामुळे या तर्कावर चर्चा करण्याची गरज नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :