Maha Shivratri 2024 : महाशिवरात्री विशेष : शंकराला रुद्राभिषेक का प्रिय आहे?

Maha Shivratri 2024 : महाशिवरात्री विशेष : शंकराला रुद्राभिषेक का प्रिय आहे?
Published on: 
Updated on: 

शिव ही कल्पनाच आपल्याला अभय देणारी वाटते कारण, स्वतः ध्यानमग्न असताना देखील आपल्या शिरावर धारण केलेल्या, जटेमधून निघालेला गंगेचा प्रवाह, लोककल्याणार्थ पृथ्वीवर वाहता ठेवला आहे. हा नुसता जलाचा प्रवाह नसून तो मायेचा प्रवाह आहे. गंगा ही हिमालयातून जेव्हा पृथ्वीवर उतरते, तेव्हा ती अनेक नद्यांना पवित्र करून पुढे जाते. तिच्या तीरावर वसणार्‍या प्रत्येक जीवाला अभय देऊन जाते. ती सर्वांनाच तृप्त करते. भगवान शंकर हे सतत ध्यानमग्न असले तरी त्यांचे लक्ष प्रत्येक जीवावर तेवढेच आहे. (Maha Shivratri 2024)

ध्यानमग्न असलेल्या शंकराला रुद्र असेही म्हटले जाते. रुद्र म्हटले की तेजोमय किंवा संतप्त, रागीट असा स्वभाव कळतो, परंतु काही त्यांच्या अशाही लीला आहेत की शंकर हे भोळे आहेत, असेच उमजून येते. स्वतः शंकरांनी याच भोळेपणातून लंकाधीश रावणाला आपले आत्मलिंग दिले होते. तसेच भगवान विष्णूंनाही आपले सुदर्शन चक्र दिले. त्यांचे हृदय अगदी आईच्या ममतेसमान आहे. म्हणूनच त्यांना 'त्वमेव माता' असे ऋषिगण संबोधतात. (Maha Shivratri 2024)

ध्यायेन्नित्यं महेशं रजतगिरीनिभं चारूचंद्रावतंसं।
रत्नाकल्पोज्जलांगं परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नम्।
पद्मासीनं समन्तात् स्तुतममरगणैर्व्याघ्रक्रुत्तिंवसानं।
विश्‍वाद्यं विश्‍ववंद्यं निखिलभयहरं पंचवक्त्रम् त्रिनेत्रम्॥

रुप्याच्या पर्वताप्रमाणे गौर, मस्तकी चंद्रकोर धारण करणारा, रत्नासारखे ज्याचे अंग उज्ज्वल आहे, असा परशू व मृग धारण करणारा, वरद व अभय मुद्रा धारण करणारा, प्रसन्न पद्मासनावर अधिष्ठित, सर्व बाजूंनी देवगण उभे राहून ज्याची स्तुती करतात असा, व्याघ्रचर्म पांघरणारा, विश्‍वाचा आद्य, विश्‍ववंद्य, संपूर्ण भय हरण करणारा, पंचवक्त्र व त्रिनेत्र अशा महेश शिवाचे ध्यान ऋषिगण करतात. या ध्यानातच भगवान शंकराचे श्रेष्ठत्व दिसून येते. (Maha Shivratri 2024)

शिवाची पूजा लिंगरूपात करतात. सोमवार हा शिवाचा वार समजला जातो. या दिवशी अनेक शिवभक्त नक्त भोजन (एक वेळ भोजन) करतात. तसे पाहता महिन्याच्या शुद्ध त्रयोदशीच्या रात्रीला शिव प्रदोष मानला जातो. या दिवशी जर सोमवार आला तर सोमप्रदोष ठरतो व शनिवार आल्यास शनिप्रदोष होतो. शिव उपासनेत प्रदोष पूजा प्रशस्त मानली जाते. प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीची रात्र ही शिवरात्री म्हणून प्रसिद्ध आहे, परंतु माघ मासातली शिवरात्र ही महाशिवरात्र (Maha Shivratri 2024) मानली जाते. या रात्री शिवाची यामपूजा केली जाते.

भगवान शंकराला रुद्राभिषेक (Rudrabhishek) अतिशय प्रिय आहे. रुद्रसुक्ताने शिवाची विशिष्ट पूजा याच दिवशी केली जाते. शिवाचे प्रतीक असलेल्या पिंडीवर दूध किंवा पाण्याची संततधार शिवाला म्हणजेच शंकराला, रुद्राला शांत ठेवते. हा अभिषेक रुद्राध्याय म्हणून प्रसिद्ध आहे. हा रुद्राध्याय अकरा अनुवाक नमकाचे व अकरा अनुवाक चमकाचे असा आहे. हे रुद्र अकरा वेळा म्हटले की, एकादशनी होते. तसेच यामध्ये क्रमाने लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र या एकादशनीच्याच चढत्या श्रेणी आहेत. भगवान शंकराचे व्रत हे अतिकठीण स्वरूपाचे मानले जाते. कारण एकदा शिवाचे कोणतेही व्रत स्वीकारले की ते अगदी कटाक्षाने पूर्ण करावे लागते. असा दंडकच आहे. ज्यांनी अगदी मनापासून श्रद्धेने संपूर्ण व्रत केले, त्यांना त्याचे उत्तमच फळ मिळाले आहे. प्रत्येकाने आपल्या शक्तीप्रमाणे व्रताचे आचरण करावे. (Mahashivratri 2024)

भगवान शंकराला बिल्वपत्र व शुभ्र कमळ अतिप्रिय आहे. याची कथा शिवमहिम्न या स्तोत्रात श्‍लोक रूपाने प्रसिद्ध आहे. शिवाचा महानैवेद्य गुरुव पुजार्‍यालाच देतात. गुरव हा मुख्यत्वे शिवाचे पुजारी आहेत. ते बर्‍याच शिवाच्या मंदिरांत दिसतात. शंकरांच्या प्रत्येक कथेतही गुरव पुजारी म्हणून उल्लेख आढळतो. शिवाला पाच नमस्कार घालावेत, असे सांगितले जाते कारण, तो पंचवक्त्र आहे. शिवाची प्रदक्षिणा सोमसूत्री असते. म्हणजे डाव्या हाताने जायचे आणि पुन्हा परत येऊन ती उत्तरेकडे तीर्थ वाहून जाते तेथपर्यंत येऊन प्रदक्षिणा पूर्ण करायची कारण, शिवाचे तीर्थ किंवा निर्माल्य ओलांडले असता त्याचे खूप मोठे पातक लागते, अशी श्रद्धा आहे काही.

एक आख्यायिकाही याबद्दल प्रसिद्ध आहे. शिवमहिम्न हे अतिशय सुंदर रचलेले स्तोत्र आहे. या सुंदर स्तोत्राचे रचयिता पुष्पदंत हे शिवाचे पार्षद होते. अत्यंत लोकप्रिय या स्तोत्राचा उपयोग भगवान शंकरावर अभिषेक करताना देखील केला जातो. हे म्हणावयास अवघड असले, तरी ते खूपच सुंदर आहे. असे सांगितले जाते की, पुष्पदंत किंवा कुसुमदश नावाचा एक गंधर्व होता. एका राजाच्या बागेतून दररोज तो फुले न सांगता घेऊन जात असे. त्याला शोधून काढण्यासाठी राजाने प्रमाद वनातील मार्गावर एकदा शिव निर्माल्य पसरून ठेवले. शास्त्राप्रमाणे निर्माल्य ओलांडले जाऊ नये असे आहे, परंतु या गंधर्वाचा त्यावर पाय पडला आणि त्याची सर्व शक्ती कुंठित झाली. परंतु याने अंतर्ज्ञानाने जाणल्यावर परम कारुणिक व सर्व इच्छा पूर्ण करणार्‍या शंकरांची आपण अवहेलना केली आहे, हे त्याला समजून आले. झालेल्या कृत्याबद्दल त्याला अतिशय दुःख झाले. त्याला माहीतही नव्हते की, वाटेमध्ये निर्माल्य पसरले आहे आणि ते शंकराच्या पिंडीवरील आहे. झालेल्या या अपराधीपणाची त्याला जाणीव झाली, परंतु पुन्हा शंकराच्या सेवेमध्ये जाता आले नाही. तो पृथ्वीवरच सर्व शक्ती क्षीण झाल्यामुळे राहू लागला. त्याने सर्व इच्छा पूर्ण करणार्‍या श्री शिव शंकराची स्तुती आरंभ केली. ती स्तुती म्हणजेच हे शिवमहिम्न स्तोत्र. या स्तोत्राची भाषा अतिशय ओजस्वी आणि प्रौढ आहे. अनेक जोडशब्दांनी या स्तोत्राला गुंफलेले आहे. असे हे अर्थ गौरव व अर्थ गांभीर्य असलेले स्तोत्र फक्त आणि फक्त शिवशंकराचीच स्तुती व गौरव करते. या स्तोत्राचे गायनही केले जाते. हा गंधर्व शंकरांच्या परिषदांमधील एक गायक होता. पुष्पदंताने या स्तोत्राला वाङ्मयीन पूजा असे म्हटले आहे कारण, शब्दपुष्पांनीच शंकराची त्याने पूजा बांधलेली आहे. भगवान शंकरांना अगदी अंतःकरण पूर्वक या स्तोत्राद्वारे आळवले आहे आणि त्याचे पापही नष्ट झाले. या स्तोत्रामध्ये जेवढे श्‍लोक आहेत, तेवढ्या शंकरांच्या लीला या श्‍लोकांमध्ये त्याने गुंफलेल्या आहेत. त्यामुळे हे स्तोत्र त्रिकाळ म्हटल्यास तो शंकरप्रिय होईल. याप्रमाणे या गंधर्वाला म्हणजेच पुष्पदंताला भगवान शिव-पार्वतीकडून पुन्हा सर्व शक्ती मिळाल्या आणि तो भगवान शंकराच्या सेवेत रुजू झाला.

वाङ्मयी पूजा या स्तोत्राची थोरवी सांगताना पुष्पदंत म्हणतो, हे ईश्‍वरा काळ्या पर्वताएवढे काजळ समुद्राच्या पात्रात घातले, त्याची शाई केली, कल्पवृक्षाच्या शाखेची (फांदीची) लेखणी केली व पृथ्वीचा जरी कागद केला आणि हे प्रचंड लेखन साहित्य घेऊन प्रत्यक्ष, शारदा (विद्या) देवी सरस्वती जरी सर्वकाळ लिहीत राहिली तरी, तुझ्या गुणांचा अंत लागणार नाही. तुझे संपूर्ण गुणवर्णन करणे शारदेलाही अशक्य आहे. शंकराच्या कृपाप्रसादाला कोणतीही सीमारेषा नाही. करुणाकर शिव भक्तांच्या विविध पापांचा नाश करून त्यांच्यावर प्रसन्न होतोच. (Maha Shivratri 2024)

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news