![Exit Poll Results 2023 : मध्यप्रदेश-राजस्थानमध्ये भाजपची मुसंडी तर छत्तीसगडमध्ये पुन्हा काँग्रेस, पहा एक्झिट पोल](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F11%2FAssembly-Election-2023-Exit-polls.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा २०२४ निवडणुकीची 'सेमीफायनल' मानले गेलेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे मतदान प्रक्रिया पार पडली आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्ता टिकवण्याचे काँग्रेससमोर आव्हान आहे. तर मध्य प्रदेशमध्ये सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. तेलंगणामध्ये बीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव यांची हॅटट्रिक रोखण्यासाठी काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत आहे. मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट (MNF) विरुद्ध काँग्रेसच्या लढतीला यंदा झोरम पीपल्स मूव्हमेंट पक्षाचेही आव्हान आहे. दरम्यान, आज ( दि. ३० ) तेलंगणा राज्यात मतदान प्रक्रिया पार पडली. यानंतर सायंकाळी जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार, मध्यप्रदेश-राजस्थानमध्ये भाजपची मुसंडी तर छत्तीसगडमध्ये पुन्हा काँग्रेस असा अंदाज बहुतांश एक्झिट पोलने (Exit Poll Results 2023) व्यक्त केला आहे. वास्तविक पाचही राज्यातील अधिकृत निकाल ३ डिसेंबर राेजी जाहीर हाेणार आहे. मतदान केंद्रातून बाहेर पडल्यानंतर तत्काळ मतदारांकडून घेतलेल्या माहितीच्या आधारे एक्झिट पोलचा अंदाज वर्तविला जातो. जाणून घेवूया पाच राज्यातील Exit polls मधील माहिती…
मध्य प्रदेश विधानसभेच्या २३० जागांवर यंदा काँग्रेस आणि भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली आहे. Jan ki Baat एक्झिट पोलनुसार राज्यात राज्यात भाजपला १०० ते १२३, काँग्रेसला १०२-१२५, इतर ५ जागांपर्यंत मजल मारण्याची शक्यता आहे.
एक्झिट पोलचे अंदाज :
राजस्थान विधानसभेच्या २०० जागांपैकी १९९ मतदारसंघात निवडणूक झाली आहे. यंदा काँग्रेस आणि भाजप अशीच थेट लढत आहे. Jan Ki Baat एक्झिट पोलनुसार राज्यात भाजप १००-१२२ तर काँग्रेस ६२-८५ जागांपर्यंत मजल मारण्याची शक्यता आहे.
एक्झिट पोलचे अंदाज :
छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांसाठी ७ नोव्हेंबर आणि १७ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान झाले होते. आता Jan Ki Baat एक्झिट पोलनुसार, राज्यात भाजपला ३४ ते ४५, काँग्रेसला ४२-५३ जागांपर्यंत मजल मारण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
एक्झिट पोलचे अंदाज :
तेलंगणा विधानसभेच्या ११९ सदस्यांची निवड करण्यासाठी आज मतदान झाले. राज्यात विधानसभा प्रचार काळात भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगला होता. आजच्या एक्झिट पोलनुसार राज्यात काँग्रेस आणि केसीआरमध्ये चुरस पहायला मिळत आहे. आता Jan ki Baat एक्झिट पोलनुसार, राज्यात भारत राष्ट्र समितीला ४० ते ४५ , काँग्रेसला ४८ ते ६४ तर भाजपला ७ ते १३ आणि इतर ४-७ जागांवर समाधान मानावे लागणार आहे.
एक्झिट पोलचे अंदाज :
मिझोरामच्या ४० विधानसभा मतदारसंघांसाठी ७ नोव्हेंबरला मतदान झाले. विधानसभा निवडणुका संपल्यानंतर वेगवेगळ्या एजन्सींनी मिझोरामसाठी एक्झिट पोलही जारी केले आहेत. एक्झिट पोलनुसार, माजी आयपीएस लालदुहोमा यांचा पक्ष झोराम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे. हा पक्ष सत्ताधारी एमएनएफला कडवी टक्कर देत असल्याचे दिसत आहे. Aaj Tak-Axis My India च्या अंदाजानुसार, ZPM ला 28-35 जागा मिळतात. MNF ला ३-७ जागा दाखवल्या आहेत. काँग्रेसला 2-4 जागा मिळू शकतात. याशिवाय भाजपला 0-2 जागा मिळू शकतात.