बैल पोळ्यावर लम्पीचे सावट !!

बैल पोळ्यावर लम्पीचे सावट !!

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा :  बैल पोळा सणावर लम्पीचे सावट असल्याने या दिवशी हा सण जनावरे एकत्रित करून साजरा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे घरच्या घरीच आनंदात पोळा साजरा करावा लागणार आहे. वर्षातून एकदा होणारा बैल पोळा सण आज साजरा होत आहे. मात्र, लम्पीचा संसर्ग वाढल्याने तो पसरून नये म्हणून जिल्हा प्रशासनाने काळजी घेती आहे. जिल्हाधिकार्‍यांनी जनावरे जमाव करण्यास मनाईचा आदेश दिला आहे. केवळ यामुळे जनावरांचे आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत. पोळा सणाला बैलांची सजावट करून एकत्रित त्यांची मारुती मंदिरापासून वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. यंदा लम्पीमुळे दक्षता घ्यावी लागणार आहे, घरच्या घरीच आनंदाने जनावरांचे पुजन करावे लागणार आहे.

सध्या शेवगाव तालुक्यातील 91 गावात लम्पीचा संसर्ग असून, तालुक्यात 886 जनावरे बाधित आहेत. तर 33 जनावरांचा मृत्यू झाला आहे. जवळपास सर्वच गावात हा संसर्ग पसरला असून, गतवेळी आलेल्या साथीत दोन हजार 547 जनांवरे बाधित झाले होते. त्यातून दोन हजार 448 जनावरे बरे झाले, तर 99 जनावरांचा मृत्यू झाला होता.

जमाव करण्यास जिल्हाअधिकार्‍यांची मनाई आहे. तर, संपूर्ण जिल्हा बाधित व सतर्कता क्षेत्र जाहीर केला आहे. त्यामुळे तालुक्याच्या कोणत्याही गावात जनावरे एकचित करून पोळा सण साजरा करता येणार नाही किंवा मिरवणूक काढता येणार नाही. पशुधन विकास अधिकार्‍यांनी याबाबत पोलिस ठाण्यास गावागावात अशा सूचना देण्याचे पत्र दिले आहे.

शेतकर्‍यांनी सहकार्य करावे : डॉ. खेतमाळीस
ग्रामपंचायती या संदर्भात एकत्रित पोळा न करण्याचे आवाहन करत आहेत. तर, पशुपालकांनी स्वत:हून दक्षता घ्यावी, पोळा सणाला जनावरे एकत्र आणू नये, घरच्या घरीच बैलपुजा करून आनंदाने सण साजरा करावा, लम्पी आटोक्यात आणण्यास सहकार्य करावे, असे आवाहन तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश खेतमाळीस यांनी केले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news