

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : संसदेचे विशेष अधिवेशन १८ सप्टेंबरपासून सुरू होत असून, १९ तारखेला ते नव्या इमारतीत शिफ्ट होणार आहे. मात्र त्याआधी, म्हणजे १७ सप्टेंबर रोजी नव्या संसद इमारतीवर तिरंगा फडकवण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. याच दिवशी नव्या इमारतीत विश्वकर्मा पूजा होईल. योगायोग म्हणजे १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, यंदा मोदींचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करण्याचे नियोजन भाजपने सुरू केले आहे. मुंबईत जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी १५ दिवस कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. रक्तदान शिबिर, आयुष्मान भारत कार्डचे वाटप, स्वच्छता मोहीम आदी कार्यक्रमांचा धडाका असणार आहे. खासदारांपासून आमदार, नगरसेवक, जिल्हाध्यक्ष, मंडल अध्यक्षांना कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोदींच्या वाढदिवसापासून महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत देशभरात विविध कार्यक्रम सुरू राहणार आहेत.
केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले असून या कालावधी चार विधेयके संसदेत मांडली जाणार आहेत. बुधवारी राज्यसभेने जारी केलेल्या संसदीय निवेदनपत्रातही माहिती देण्यात आली. १८ सप्टेंबर रोजी राज्य ७५ वर्षांचा संसदीय प्रवास, उपलब्धी, अनुभव, आठवणी आणि धडे यावर चर्चा होईल. पोस्ट ऑफिस विधेयक २०२३ आणि मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित विधेयके राज्यसभेत मांडली जातील.