Lok Sabha Elections 2024 : जम्‍मू-काश्‍मीरमध्‍येही ‘इंडिया’ आघाडीत ‘बिघाडी’, ओमर अब्‍दुल्‍ला ‘पीडीपी’वर भडकले

 नॅशनल कॉन्‍फरन्‍स नेते आणि जम्‍मू-काश्‍मीरचे माजी मुख्‍यमंत्री ओमर अब्‍दुल्‍ला. ( संग्रहित छायाचित्र )
 नॅशनल कॉन्‍फरन्‍स नेते आणि जम्‍मू-काश्‍मीरचे माजी मुख्‍यमंत्री ओमर अब्‍दुल्‍ला. ( संग्रहित छायाचित्र )

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणुका जाहीर होण्‍यापूर्वी स्‍थापन झालेल्‍या भाजप विरोधी पक्षांच्‍या इंडिया आघाडातील धुसफूस निवडणूक रणधुमाळीतही कायम राहिली आहे. जम्‍मू-काश्‍मीरमधील नॅशनल कॉन्‍फरन्‍स आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) पक्षातील मतभेद पुन्‍हा एकदा चव्‍हाट्यावर आले आहेत. ( Lok Sabha Elections 2024: Cracks in INDIA bloc in J&K? )

आज माध्‍यमांशी बोलताना नॅशनल कॉन्‍फरन्‍सचे नेते ओमर अब्‍दुल्‍ला म्‍हणाले की, 'पीडीपी'च्‍या नेत्‍या मेहबूबा मुफ्‍ती यांनी दिल्‍ली येथील इंडिया आघाडीच्‍या सभेत फारुख अब्‍दुला आणि आमची आघाडी असल्‍याचे म्‍हटलं होते. तसेच त्‍यांनी इंडिया आघाडी तुटणार नाही, असा दावाही केला हाेता;मग त्‍यांनी जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये नॅशनल कॉन्‍फरन्‍सच्‍या उमेदवाराविरोधात निवडणूक का लढवत आहेत, असा सवालही ओमर  यांनी केला.  २०१४च्‍या विधानसभा निवडणुकीत आम्‍ही 'पीडीपी'ला डीडीसी उमेदवार निवडण्‍याची संधी दिली, याचेही स्‍मरण त्‍यांनी यावेळी करुन दिले. ( Lok Sabha Elections 2024: Cracks in INDIA bloc in J&K? )

'एनसी'ने अनंतनाग-राजौरीमध्‍ये मियां अल्ताफ यांना दिली उमेदवारी

नॅशनल कॉन्फरन्सने (एनसी) जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग-राजौरी मतदारसंघातून पक्षाचे ज्येष्ठ नेते मियां अल्ताफ अहमद लाहरवी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्‍यामुळे आता माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) सोबत नॅशनल कॉन्‍फरन्‍सची युती होण्याची शक्यता जवळजवळ संपुष्टात आल्‍याचे मानले जात आहे. ( Lok Sabha Elections 2024: Cracks in INDIA bloc in J&K? )

अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघ हा मेहबूबा मुफ्ती यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. २०१४ मध्‍ये या मतदारसंघात मेहबूबा मुफ्‍ती यांचा विजय झाला होता. यांचे वडील आणि पीडीपी संस्थापक, दिवंगत मुफ्ती मोहम्मद सईद हे देखील 1998 मध्ये पूर्वीच्या अनंतनाग मतदारसंघातून निवडून आले होते.  2022 च्या सीमांकनात पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांचा समावेश झालेल्‍या मतदारसंघाचे अनंतनाग-राजौरी असे नामकरण करण्यात आले आहे.  दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग भागात मुस्लिमांचे प्राबल्य आहे, तर पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुज्जर आणि पहाडी लोकसंख्या आहे. लाहरवी हे प्रमुख गुज्जर धर्मगुरू आहेत. या मतदारसंघात २०१९ मध्‍ये नॅशनल कॉन्‍फरसचे हसनैन मसूदी यांनी निवडणूक जिंकली होती. तर मेहबूबा मुफ्ती तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या होत्‍या.

फारुख अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांनी 31 मार्च रोजी नवी दिल्लीत भारत ब्लॉकच्या 'लोकतंत्र बचाओ' रॅलीला उपस्‍थिती लावली होती. जम्‍मू- काश्‍मीरमध्‍ये इंडिया आघाडी कायम राहिल, असे यावेळी मेहबुबा मुफ्ती म्‍हणाल्‍या होत्‍या. सोमवार, १ एप्रिल रोजी ओमर अब्दुल्ला यांनी लाहरवी यांची अनंतनाग-राजौरी मतदारसंघातून उमेदवार म्‍हणून घोषणा केली. यानंतर दाेन्‍ही पक्षांमधील मतभेद पुन्‍हा एकदा चव्‍हाट्यावर आले आहेत.

जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये इंडिया आघाडीत फूट पडणार ?

२०१९ लोकसभा निवडणुकीत काश्मीर विभागातील तीनही जागा नॅशनल कॉन्‍फरन्‍सने जिंकल्या होत्या. जम्मू विभागातील दोन जागा आणि लडाखमधील एकमेव जागा भारतीय जनता पक्षाने (BJP) जिंकली होती. आता अनंतनाग-राजौरी मतदारसंघातून एनसीकडून निवडणूक लढविणारे लहरवी यांनी यापूर्वी पाचवेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे. ते  जम्‍मू-काश्‍मीर सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही राहिले आहेत. पीडीपी अनंतनाग-राजौरी जागेवरून आपला उमेदवार उभा करण्‍याचा मानस व्‍यक्‍त करत आहे. तर नॅशनल कॉन्फरन्स काश्मीरमधील तीनही जागांवर निवडणूक लढवण्‍यासाठी आग्रही आहे. दोन्ही पक्षांनी स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवण्याचे जाहीर केल्‍याने जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये इंडिया आघाडीत फूट पडेल, असे मानले जात आहे.

कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुका या पहिल्याच निवडणुका असतील. जम्मू-काश्मीरमध्ये 19 एप्रिलपासून पाच टप्प्यात मतदान होणार असून मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news