पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शह देण्यासाठी काँग्रेससह भाजप विरोधी पक्षांनी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीची शकले राष्ट्रीय पातळीवर होत असतानाच गोव्यामध्येही या आघाडीत फूट पडण्यास सुरूवात झाली आहे.दक्षिण गोव्यात काँग्रेसचे विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन हे असतानाही इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या आम आदमी पक्षाने बाणावलीचे आमदार वेन्सी वियेगस यांना दक्षिण गोवा लोकसभेचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. आज (दि.१३) पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आम आदमी पक्षाचे गोवा प्रदेश संयोजक अॅड. अमित पालेकर व उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी ही घोषणा केली. Goa Politics
यापूर्वी आम आदमी पक्षाची सत्ता असलेल्या दिल्ली आणि पंजाबमध्येही आम आदमी पक्षाने काँग्रेससोबतची आघाडी तोडून सर्वच्या सर्व जागा लढविण्याचे जाहीर केले होते. गोव्यातही तेच घडले आहे. त्यामुळे आम आदमी पक्ष इंडिया आघाडीमधून बाहेर पडल्यातच जमा आहे. Goa Politics
यावेळी अॅड. अमित पालेकर यांनी सांगितले की गोव्यामध्ये आम आदमी पक्ष व काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये एकेक जागांचे वाटप व्हावे, यासाठी आम्ही काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात होतो. मात्र, काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व गोव्यातील आमच्या मागणीला कोणताही प्रतिसाद देताना दिसत नव्हते. स्थानिक काँग्रेस नेते केंद्रीय नेत्याकडे बोट दाखवत राहिले. दुसरीकडे काँग्रेस पक्षाने लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी उमेदवारी अर्ज मागवले होते. त्यानुसार त्या पक्षाकडे उमेदवारी अर्जही केले आहेत. असे असताना आणि लोकसभेची निवडणूक जवळ आलेली असताना आम आदमी पक्ष स्वस्थ बसू शकत नाही.
आम आदमी पक्षाकडेही दोन्ही जागांसाठी अनेक उमेदवार आहेत, हे यापूर्वी आम्ही स्पष्ट केले होते. काँग्रेसकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे शेवटी आम्ही दक्षिण गोव्यातून उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेससह इंडिया आघाडीतील इतर पक्षांनी आम्हाला पाठिंबा द्यावा. असे अॅड. पालेकर म्हणाले.
दक्षिण गोव्यात काँग्रेसचे विद्यमान खासदार असताना आपने उमेदवार कसा जाहीर केला, असा प्रश्न विचारला असता तो त्या पक्षाचा प्रश्न आहे. आम्ही आमचा उमेदवार जाहीर करत आहोत. असे ते म्हणाले.
हेही वाचा