Lok Sabha Election News: शिवाजी आढळराव-पाटील यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Lok Sabha Election News: शिवाजी आढळराव-पाटील यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मंचर पुणे:पुढारी वृत्तसेवा: शिरूर मतदार संघातील शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव-पाटील यांनी आज (दि.२६) अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला. आढळराव-पाटील यांच्यासोबत त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी देखील पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. (Lok Sabha Election News)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंचर (ता. आंबेगाव) येथील शिवगिरी मंगल कार्यालयात हा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेनेतील कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल झाले. शिवाजी आढळराव- पाटील यांच्या पत्नी कल्पना आढळराव यांनीही आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी अजित पवारांसह सुनिल तटकरे, दिलीप वळसे पाटील, रुपाली चाकणकर, आमदार अतुल बेनके आदी नेते उपस्थित होते. (Lok Sabha Election News)

शिरूर लोकसभेतील मंचरमध्ये आज यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शिरूर लोकसभेत शिवाजी आढळरावांना घड्याळ चिन्हावर उतरवले जात आहे. त्यांचा सामना शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील अमोल कोल्हे यांच्याशी होणार आहे. (Lok Sabha Election News)

तुम्हाला आणि मला दिल्लीत एकत्र काम करायचंय-सुनील तटकरे

शिवाजी राव तुमचे आणि माझे आणखी नाते घट्ट झाले. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभेचा पहिला उमेदवार म्हणून माझी घोषणा केली. त्यानंतर मी थेट इथंच आलो. आता इथंच सांगतो शिवाजी आढळराव तुम्हाला आणि मला दिल्लीत एकत्र काम करायचं आहे, असे मत अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी व्यक्त केले आहे.

आता विकासाचा डबल वादा अजित दादा आणि शिवाजी दादा-अतुल बेनके

राज्यात स्वाभिमान कोणी जपला असेल तर ते अजित दादांनी जपला आहे, असा निशाणा जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांवर साधला आहे. शिरुर लोकसभा मतदार संघातील जुन्नर आंबेगाव खेड तालुक्यातील आमदार दत्तात्रयांचे सुपुत्र…! नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या आढळराव-पाटील हे हि दत्तात्रय पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ही दत्तात्रय पुत्र. त्यामुळे आम्ही सर्व दत्तात्रय पुत्र नव्याने पक्षात आलेल्या आढळराव-पाटीलांच्या दत्तात्रय पुत्राला निवडुन आणुच… असे आवाहनही बेनके यांनी त्यांच्या भाषणातून केले.

रुपाली चाकणकरांचं "मशाल" हाती घेण्याचं आवाहन

समृद्ध आणि विकसित महाराष्ट्राच्या दैदिप्यमान उज्वल भविष्यासाठी आपण मशाल हाती घेऊयात. हा संकल्प हाती घेऊन आपण अजित दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुयात, असे महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी याप्रसंगी बोलताना स्पष्ट केले.

माझं आढळरावांशी कोणतंही वैयक्तिक वैर नाही-दिलीप मोहिते पाटील

मला ही शिवसेनेतून राष्ट्रवादीत अजित दादांनी आणलं. घडाळ्याच्या चिन्हावर मी कसा उभा राहिलो, याची ही एक मोठी कथा आहे. हे सांगायला कोना ज्योतिषाची गरज नाही. माझं दिलीप वळसे-पाटील आणि शिवाजी आढळरावांशी कोणतं ही वैयक्तिक वैर नाही. भामा आसखेड आणि कळंबोली धरणातील पाणी माझ्या तालुक्याला मिळावं, यासाठी माझा त्यांच्याशी संघर्ष सुरू होता. बोलल्याशिवाय काही मिळत नाही. मी बोलत होतो, त्यामुळं मतभेद दिसून आले. मात्र आता दिलीप वळसे आणि अजित दादांनी पाणी देतो, हे कबूल केलेलं आहे. इतकीच माझी भूमिका होती. आता माझा प्रश्न सुटला त्यामुळं हा पुढचा (लोकसभेचा) प्रश्न ही सुटणार आहे.

मी ही तापट आणि शिवाजी आढळराव ही तापट. त्यामुळं दोन सारख्या स्वभावाची माणसं एकत्र आली की पटत नाही. त्यामुळं गेली वीस वर्षे शिवाजी आढळरावांशी संघर्ष होता. दोघे ही शिवसेनेत होतो, त्यामुळं माघार घ्यायची कोणाची तयारी नव्हती. आता आमचं मिटले आहे. पण माझ्या तालुक्यात आढळरावांनी इतका संघर्ष का केला, याचं उत्तर अद्याप ही मला आढळरावांनी दिलेलं नाही, असे देखील दिलीप मोहिते पाटील यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news