…
ते साल होते 1952. पहिलीच सार्वत्रिक निवडणूक असल्याने देशभरात औत्सुक्याचे वातावरण होते. मराठवाडा प्रदेशाला मात्र अन्य प्रांताच्या तुलनेने लोकशाही व्यवस्थेचा फारसा अनुभव नव्हता. कारण 1734 पासून मराठवाडा, तेलंगणा, आंध्र व कर्नाटकचा काही भाग निझाम राजवटीखाली होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी लष्करी कारवाईनंतर निझाम भारतात विलिन झाला. त्यामुळे पहिल्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांवर नजर फिरविली तर स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतलेल्यांना मतदारांनी प्रतिनिधी केले हे दिसून येते.
निझामाच्या विरोधात स्टेट काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढा उभारला गेल्याने मुक्तीसंग्रामानंतर बहुतांश नेते काँग्रेसमध्ये काम करू लागले. त्यात एक होते धाराशिवचे राघवेंद्र दिवाण. 52 च्या निवडणुकीत दिवाण यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात होते शेतकरी कामगार पक्षाचे नरसिंग देशमुख यांना उमेदवारी दिली होती. देशमुखांचाही लढ्यात सहभाग राहिलेला. शेकापची स्थापना बैठक त्यांच्या काटी येथील निवासस्थानी झाली होती. त्यामुळे ही लढत दोन दिग्गजांमधील होती. या निवडणुकीत दिवाण यांना एक लाख 73 तर देशमुख यांना 92, 470 मते मिळाली. दिवाण हे धाराशिवमधून निवडून गेले. तरी, देशमुख यांना पहिल्याच राज्यसभेत संधी मिळाली हे विशेष. तेव्हा विधिमंडळ रचना पूर्ण होईपर्यंत राज्यसभेचा कालावधी हा दोन वर्षाचा असे. लॉट पद्धतीतून देशमुख यांना दुसर्यांदाही राज्यसभेवर जाता आले, पुढे त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावरून खासरदारकीचा राजीनामा दिला.
बीड मतदारसंघात काँग्रेसने श्रीधर नाईक यांना तर डाव्या, साम्यवादी विचाराच्या मंडळींनी पीपल्स डेमोक्रॅटीक फ्रंट स्थापन करीत रामचंद्र उर्फ बाबासाहेब परांजपे यांना उभे केले. त्यात परांजपे हे 9 हजार मतांनी विजयी झाले. पहिल्या निवडणुकीत जालना मतदारसंघाची निर्मिती झाली नव्हती, त्याऐवजी अंबड मतदारसंघ होता. तेथून काँग्रेसच्या तिकिटावर स्वातंत्र्यसेनानी हनुमंतराव वैष्णव, संभाजीनगरातून सुरेशचंद्र आर्य यांनी बाजी मारली. केशवराव जेधे, शंकरराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या शेकापचे नारायणराव वाघमारे हे परभणीतून निवडून आले. नांदेडमधून दोन खासदार निवडून द्यावयाचे होते. काँग्रेसचे शंकरराव टेळकीकर, नामदेवराव कांबळे विजयी झाले. कांबळे हे मूळचे पाथरीचे. शिक्षक, मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम केले होते. नांदेडची एक जागा राखीव राहिल्यामुळे कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली. कांबळे हे दुसर्या लोकसभेचेही सदस्य होते. टेळकीकर व कांबळे हे दोघेही मुक्तीलढ्यात अग्रणी होते.
हेही वाचा