नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक लोकसभा मतदारसंघात 'मराठा विरुद्ध मराठा' अशी लढत होण्याची शक्यता असल्याने, मराठा उमेदवाराला ओबीसी मतांचे गणित जुळविण्याची मोठी कसरत करावी लागणार आहे. तब्बल २० लाख एक हजार ३७८ मतदारांची संख्या असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात ओबीसी मतांचा टक्का सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ मराठा समाजाची मते अधिक असली तरी, सर्व मराठा उमेदवारच रिंगणात असल्याने मराठा समाजाच्या मतांचे विभाजन होणार आहे. अशात विजयासाठी ओबीसींचे मते निर्णायक ठरणार असून, ज्याच्या पारड्यात ते पडतील त्याच्या विजयाचा मार्ग सुकर होणार आहे.
नाशिक लोकसभेची निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता असून, चारही उमेदवार मराठा आहेत. महाविकास आघाडीने राजाभाऊ वाजे या मराठा उमेदवारा रिंगणात उतरविले आहे. वंचित बहुजन आघाडीनेदेखील मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांना मैदानात उतरवून 'मराठा कार्ड' फेकले आहे. दुसरीकडे महायुतीतून तिकिटाच्या रेसमध्ये असलेले खासदार हेमंत गोडसे, अजय बोरस्ते, विजय करंजकर हेदेखील मराठाच आहेत. तसेच अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यावर ठाम असलेले शांतीगिरी महाराज यांची पार्श्वभूमीदेखील तीच आहे. त्यामुळे नाशिकच्या रिंगणात मराठा विरुद्ध मराठा असा सामना रंगण्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास सर्वच उमेदवाराला विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी ओबीसीसह दलित, मुस्लीम मतांच्या गणिताची जुळवाजुळव करावी लागणार आहे. २० लाखांपेक्षा अधिक मतदार संख्या असलेल्या नाशिक लाेकसभा मतदारसंघात सुमारे आठ लाखांच्या आसपास ओबीसी मतदार आहेत. त्यापाठोपाठ अंदाजे सहा लाख मराठा मतदार आहेत. तसेच मुस्लीम आणि दलित मतांची संख्या प्रत्येकी दोन ते अडीच लाखांच्या आसपास आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात तथाकथिक राजकारण्यांनी मराठा आणि ओबीसी समाजाला आमनेसामने उभे करण्याचा प्रयत्न केल्याने, लोकसभा निवडणुकीत जातीय राजकारणाला ऊत आला आहे. नाशिकमध्ये याची धग अधिकच असून, मराठा उमेदवार ओबीसींना आपलेसे करण्यात कसे प्रयत्न करतील हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भुजबळांची माघार अन्…
नाशिक लोकसभा तिकिटाच्या रेसमध्ये आघाडीवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी अचानकच माघार घेतल्याने, ओबीसी विरुद्ध मराठा ही लढत टळली. आरक्षणाच्या मुद्यावरून भुजबळ विरुद्ध मराठा समाज असा संघर्ष पेटला होता. अशात भुजबळ मैदानात उतरल्यास, मराठा-ओबीसी संघर्ष उफाळून येईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, भुजबळांनी माघार घेतल्याने नाशिकच्या मैदानात सर्वच मराठा उमेदवार आमने-सामने येणार आहेत. त्यामुळे ओबीसी मतांचा लाभ घेण्यात जो यशस्वी होईल, त्याचा विजयचा मार्ग सुकर होईल.
वंचितचे मराठा कार्ड
बसपाने राबविलेला सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग वंचितकडूनही राबविला जात असून, त्यानुसार वंचितने नाशिकमध्ये मराठा उमेदवार दिला आहे. त्यामुळे मराठा मतांच्या विभाजनाबरोबरच दलित, मुस्लीम मतेही विभागली जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास त्याचा लाभ महायुतीला होऊन, महाविकास आघाडीला फटका बसेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. अर्थात महायुतीच्या उमेदवारावर हे जातनिहाय गणित बऱ्याचअंशी अवलंबून असेल.
हेही वाचा: