माेठी बातमी: केजरीवालांच्‍या ‘ईडी’ काेठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ, दाेन्‍ही बाजूंनी जाेरदार युक्‍तीवाद

अरविंद केजरीवाल. ( संग्रहित छायाचित्र.)
अरविंद केजरीवाल. ( संग्रहित छायाचित्र.)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : दिल्‍ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी अटक असलेले अरविंद केजरीवाल यांची ईडी कोठडी आज ( दि.२८ मार्च) संपली. त्‍यांना दुपारी २ वाजता दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले. न्‍यायालयाने त्‍यांच्‍या ईडी काेठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. दरम्‍यान, आजच्‍या सुनावणीत अरविंद केजरीवाल यांनी स्‍वत: युक्‍तीवाद केला. आम आदमी पार्टीला उद्‍ध्‍वस्‍त करणे हाच अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) कारवाई मागील मूळ हेतू आहे. मद्य धोरण प्रकरणी मला जाणीवपूर्वक अडकवणे हेच 'ईडी'चे एकमेव ध्‍येय आहे. मी रिमांड याचिकेला विरोध करत नाही. 'ईडी' मला हवे तितके दिवस कोठडीत ठेवू शकते; पण तपासानंतरच हा घोटाळा सुरु झाला आहे, असा दावा त्‍यांनी केला.

डिजिटल डेटा तपासणे बाकी : 'ईडी'

केजरीवालांच्‍या कोठडीत वाढ करण्‍याची मागणी ईडीने केली. यावेळी सांगिलते की, या प्रकरणी एका मोबाईल फोनमधील डेटा काढला गेला आहे आणि त्याचे विश्लेषण केले जात आहे. तथापि, 21.03.2024 रोजी अरविंद केजरीवाल यांच्या निवासाच्‍या आवारात झडतीदरम्यान जप्त केलेल्या इतर चार डिजिटल उपकरणांमधील डेटाही तपासणे बाकी आहे. कारण केजरीवाल यांनी त्याच्या वकिलांशी सल्लामसलत केल्यानंतर चार डिजिटल उपकरणांचा पासवर्ड प्रदान करण्यासाठी वेळ मागितला आहे.

यावेळी अतिरिक्‍त सॉलिसिटर जनरल एसव्‍ही राजू आणि ईडीचे विशेष वकील जोहेब हुसेन हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्‍या माध्‍यमातून तर केजरीवाल यांच्‍या वतीने ज्‍येष्‍ठ वकील रमेश गुप्ता यांनी युक्‍तीवाद केला.

'ईडी'ने मागितली सात दिवसांची कोठडी

एसव्‍ही राजू यांनी सांगितले की, दिल्‍ली मद्य धोरण संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी केजरीवाल यांचे म्हणणे नोंदवले गेले; पण त्यांनी टाळाटाळ करणारी उत्तरे दिली. त्‍यांनी या प्रकरणी सुरु असणार्‍या तपासाला जाणीवपूर्वक सहकार्य केलेले नाही. या प्रकरणी ईडीला डिजिटल डेटा तपासायचा आहे. केजरीवाल यांच्यासाठी ईडीने आणखी 7 दिवसांची कोठडी मागितली. यावेळी केजरीवाल यांचे वकील गुप्ता यांनी केजरीवाल यांना न्यायालयाला वैयक्तिकरित्या संबोधित करायचे असल्‍याचे सांगितले. न्‍यायालयाने केजरीवाल यांना आपलं म्‍हणणं मांडण्‍याची संधी दिली.

मला कितीही दिवस कोठडीत ठेवा, पण… : केजरीवालांनी केला युक्‍तीवाद

राऊस एव्हेन्यू न्यायालयात युक्‍तीवाद करताना केजरीवाल म्हणाले की,  हे प्रकरण दोन वर्षांपूर्वीपासून सुरू आहे. सीबीआयने ऑगस्ट २०२२ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ECIR फाइल तयार झाली. मला कोणी अटक केली? कोणत्याही न्यायालयाने मला दोषी ठरवले नाही किंवा माझ्यावर आरोपही केलेले नाहीत. आम आदमी पार्टीला उद्‍ध्‍वस्‍त करणे हाच अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) मूळ हेतू होता. मद्य धोरण प्रकरणी मला "सापळ्यात" अडकवणे ईडीचे एकमेव ध्‍येय आहे," असा आरोपही त्यांनी केला.

'ईडी' तपासानंतर खरा घोटाळा सुरु झाला, मला अटक करण्याचे कारणच नव्‍हते'

"मला अटक करण्यात आली होती, कोणत्याही कोर्टाने मला दोषी सिद्ध केले नाही. सीबीआयने 31,000 पानांची आणि ईडीने 25,000 पानांची याचिका दाखल केली आहे. तुम्ही ते एकत्र वाचले तरी, मला अटक करण्याचे कारणच नव्‍हते. कारण जर 100 कोटी रुपयांचा दारू घोटाळा झाला असेल तर तो पैसा कुठे आहे? असा सवाल करत ईडीच्या तपासानंतर खरा घोटाळा सुरू झाला. या प्रकरणातील माफीचा साक्षीदार सरथ रेड्डी याने भाजपला ५५ कोटी रुपये दान केले आहे. हे मोठे रॅकेट असून, माझ्‍याकडे याचे पुरावे आहेत. मला अटक झाल्‍यानंतर भाजपला ही देणगी मिळाली, असा गंभीर आराेपही त्‍यांनी या वेळी केला.

राजूसाहेब, मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत. कृपया मला बोलू द्या…

तुम्‍ही तुमचं मत लेखी द्‍या आम्‍ही याची नाेंद घेवू, असे यावेळी न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले. यावर मला माझं म्‍हणणं मांडण्‍याची संधी द्‍या अशी मागणी केजरीवाल यांनी केली. यावर अतिरिक्‍त सॉलिसिटर जनरल एसव्‍ही राजू यांनी आक्षेप घेतला. "राजूसाहेब, मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत. कृपया मला बोलू द्या," अशा शब्दांमध्ये केजरीवाल यांनी विनंती केली. माफीच्‍या साक्षीदाराने केलेली विधाने एका मुख्‍यमंत्रीपदावरील व्‍यक्‍तीला अटक करण्‍यासाठी पुरेशी आहेत का, या प्रकरणी 'ईडी'कडे एक लाखांहून अधिक कागदपत्र आहेत ती रेकाॅर्डवर आणली जात नाहीत, असा दावाही त्‍यांनी केला.

मुख्‍यमंत्री आहे म्‍हणून घोटाळ्यातून सुटका होत नाही : ASG एसव्‍ही राजू

केजरीवालांचे सर्व आरोप अतिरिक्‍त सॉलिसिटर जनरल (ASG) एसव्‍ही राजू यांनी फेटाळले. ते म्‍हणाले की, केजरीवाल निर्दोष असल्‍याचे पुरावे ईडीच्‍या ताब्‍यात आहेत, हे केजरीवाल यांना कसे समजले, हे सारे काही केवळ कल्‍पना आहेत. ते आम आदमी पार्टीचे प्रभारी आहेत. गोवा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या लाचेची रक्कम 'आप'ला मिळाली आहे. ते पैसे साऊथ ग्रुपकडून हवालामधून आले आहेत, असे म्हणण्यासाठी आमच्याकडे साक्षीदार आहेत. एक साखळी आहे. त्या साखळीबद्दल केजरीवाल काहीच सांगत नाही.मुख्‍यमंत्री पदावरील व्‍यक्‍ती आहे म्‍हणून त्‍याची घोटाळातून सुटका होत नाही. या देशात जो सर्वसामन्‍य माणसाला नियम आहे तोच मुख्‍यमंत्रीपदावर बसलेल्‍या व्‍यक्‍तीसाठीही मुख्यमंत्र्यांना अटक करण्याचा अधिकार सामान्य माणसापेक्षा वेगळा नाही, असाही युक्‍तीवाद एसव्‍ही राजू यांनी केला.गोवा निवडणुकीत हवालाद्वारे १०० कोटी दिले गेले. एक साखळी आहे. त्याचा वापर 'आप'ने केला आहे, असेही त्‍यांनी सांगितले.

कृपया तुमचा आवाज कमी करा : न्‍यायालयाने वकिलांना सुनावले

अतिरिक्‍त सॉलिसिटर जनरल एसव्‍ही राजू यांचा युक्‍तीवादावर बोलण्‍याची केजरीवाल यांच्‍या वकील रमेश गुप्ता यांनी मागणी केली. याला ईडीने आक्षेप घेतला. तुम्‍ही उत्तर दिले आहे. ते असंबद्ध काय आहे? असे सांगितले. ते अप्रासंगिक आहे असे कसे म्हणता येईल, असे गुप्‍ता म्‍हणाले. दोन्‍ही बाजूंनी खडाजंगी सुरु असताना कृपया तुमचा आवाज कमी करा. मी सर्वांचे ऐकले आहे, असे न्‍यायालयाने वकिलांना सुनावले. तसेच सुमारे एका तासाच्‍या युक्‍तीवादानंतर आम्‍ही या प्रकरणी निर्णय राखून ठेवत असल्‍याचे सांगितले.

केजरीवालांच्‍या 'ईडी' काेठडीत चार दिवसांची वाढ

दाेन्‍ही बाजूंचा युक्‍तीवादानंतर दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयाने केजरीवालांच्‍या 'ईडी' काेठडीत चार दिवसांची वाढ केली. आता 1 एप्रिल रोजी सकाळी 11:30 वाजता केजरीवाल यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

काय आहे प्रकरण?

दिल्ली मद्य धोरण प्रकरणाच्या तपासाचे मुख्य लक्ष मध्यस्थ, व्यापारी आणि राजकारणी यांच्या कथित नेटवर्कवर होते ज्याला तपास यंत्रणांनी "दक्षिण ग्रुप" म्हटले आहे. ईडीचा आरोप आहे की "दक्षिण ग्रुप"च्या कंपन्यांना मदत करण्यासाठी मद्य धोरणात बदल करण्यात आला होता आणि सिसोदिया यांनी कोणताही सल्ला न घेता त्यांच्या हिताच्या दृष्टीने सौम्य भूमिका घेतली.

मद्य धोरण घोटाळाप्रकरणी 'ईडी'ने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह 'आप'च्या अन्य नेत्यांना यापूर्वीच अटक केली आहे. 'ईडी'ने  केजरीवाल यांना चौकशीसाठी ९ वेळा समन्स बजावले होते. त्यांनी 'ईडी'च्या नोटिसा आणि अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतर 'ईडी'चे पथकाने २१ मार्च रात्री दहावी नोटीस आणि सर्च वॉरंट घेऊन केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले. केजरीवाल यांची तब्बल दोन तास चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांचा मोबाईल जप्त करण्यात आला होता. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली हाेती. दरमान्य, मद्य धोरण घोटाळाप्रकरणी केजरीवाल यांच्या अटकेत हस्तक्षेप करण्यास बुधवारी ( दि. २७ मार्च) दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला हाेता.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news