Goa Politics : भाजप विरोधी समविचारी पक्षांनी एकत्र यावे असे आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी केल्यानंतर शनिवारी सकाळी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी कार्याध्यक्ष किरण कांदोळकर यांच्यासह त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर ममता बॅनर्जी या प्रादेशिक पक्ष बळकट होण्याच्या मताच्या आहेत हे पाहून बरे वाटले. त्यांच्याशी झालेली चर्चा आपण पक्षाच्या इतर नेत्यांशी करणार असून त्यानंतरच काय ते बोलू, असे सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
बॅनर्जी या गुरुवारी सायंकाळी उशिरा गोव्यात दाखल झाल्या. काल शुक्रवारी दिवसभरात त्यांनी अनेक बैठका घेतल्या. काही ठिकाणी दौरे केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव, अपक्ष आमदार रोहन खंवटे, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर आणि दीपक ढवळीकर यांनी शुक्रवारी त्यांची भेट घेतली होती.
सरदेसाई काँग्रेससोबत आघाडी करण्यास सुरुवातीला इच्छूक होते. काँग्रेसने दिवाळीपर्यंत काय तो निर्णय घ्यावा यासाठी ते प्रयत्नशील होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे शनिवारी गोव्यात पोहोचत असतानाच सरदेसाई आणि ममता बॅनर्जी यांची भेट चर्चेची ठरली आहे. (Goa Politics)