Goa : गोवा राज्य देशाची ताकत बनू शकते : पंतप्रधान मोदी - पुढारी

Goa : गोवा राज्य देशाची ताकत बनू शकते : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

गोवा ( Goa ) राज्य म्हणजे विकासाचे नवे मॉडेल असल्याचे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा ( Goa ) योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधताना काढले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदी यांनी योजनेच्या लाभार्थ्यांशी विविध मुद्यांवर चर्चा केली. केंद्र सरकारच्या योजना राबविण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत मेहनत घेत असल्याचेही मोदी यांनी यावेळी नमूद केले.

आत्मनिर्भर भारत योजना राबविण्यासाठी ज्या-ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, त्या गोष्टी गोवा ( Goa ) राज्यात आहेत. केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजपचे सरकार सत्तेत आहे. त्यामुळे डबल इंजिन वेगाने धावत आहे, असे सांगून मोदी पुढे म्हणाले की, खाद्यान्न प्रक्रिया क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी असून स्वयंपूर्ण योजनेअंतर्गत गोवा सरकार या क्षेत्रात आणि त्यातही फिश प्रोसेसिंगमध्ये व्यापक काम करु शकते. गोवा राज्य भारताची ताकत बनू शकते. भारतात पकडल्या जाणार्‍या माशांवर पूर्व आशियाई देशांत प्रक्रिया केली जाते आणि तेथून ते जागतिक बाजारपेठांत पाठविले जाते. अशा स्थितीत गोवामध्येच फिश प्रोसेसिंग कसे होईल, याकडे लक्ष दिले जाऊ शकते.

फिश प्रोसेसिंग उद्योगासाठी केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर मदत करीत असल्याची माहिती मोदी यांनी दिली. शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी सरकार कटिबध्द आहे. पशुपालन, मत्यउद्योगाला प्रोत्साहन दिले जात आहे. गोव्याच्या ( Goa ) ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी यंदा दिल्या जाणार्‍या मदतनिधीत पाच पटीने वाढ करण्यात आलेली आहे, असेही ते म्हणाले. आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा गतवर्षी सुरु करण्यात आली होती.

Back to top button