म्हैसूर; पुढारी ऑनलाईन
गुजरात सरकारने नुकताच शाळेत विद्यार्थ्यांना श्रीमद्भगवद्गीता (Bhagavad Gita) शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही राज्यातील शाळांत भगवद्गीतेचे पाठ शिकवण्याचा विचार केला जाऊ शकतो, असा सूर व्यक्त केला होता. त्यानंतर आता कर्नाटकचे कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री जेसी मधुस्वामी यांनी भगवद्गीतेच्या पवित्र ग्रंथातील पाठांचा राज्यातील शालेय अभ्यासक्रमात समावेश केला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
राज्यातील शाळांमध्ये भगवद्गीतेचे पाठ शिकविण्याचा विचार राज्य सरकार करीत असल्याचे याआधी कर्नाटकचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी सांगितले होते. राज्यातील शाळांमध्ये नीतिशास्त्र शिकवण्याचा निर्णय मुख्यमंत्री बोम्मई यांच्याशी चर्चा करुन घेतला जाईल असेही त्यांनी नमूद केले होते. शाळांत याआधी नीतिशास्त्र शिकवण्यासाठी एक तासिका घेतली जात होती. यात रामायण, महाभारत मधील कथांवर आधारित धडे शिकवले जायचे, असेही बी. सी. नागेश यांनी म्हटले होते. आता यावर कर्नाटकचे कायदा मंत्री जेसी मधुस्वामी यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
विधानसभा निवडणुकीआधी गुजरात सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. गुजरात सरकारने शाळेत विद्यार्थ्यांना श्रीमद्भगवद्गीता (Bhagavad Gita) शिकवण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या टप्प्यात ६ वी ते १२ वी पर्यंतच्या मुलांना भगवद्गीतेतील श्लोक आणि सार समजून सांगितले जाणार आहे. याबाबतची माहिती नुकतीच राज्य सरकारकडून जारी केलेल्या परिपत्रकातून देण्यात आलीय. नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान गुजरात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शालेय अभ्यासक्रमात श्रीमद्भगवद्गीतेचा समावेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
हे ही वाचा :