प्रज्ञा केळकर-सिंग :
पुणे : 'यंदा पाऊस लांबल्यामुळे पेरण्या करता आल्या नाहीत…आषाढी वारीही दोन आठवडे लवकर आली…आता पाऊस सुरू झाला…विठूरायाचे दर्शन झाल्यावर लगेच गावाकडे परतून पेरण्या करायच्या आहेत. यंदा पीक-पाणी व्यवस्थित होऊ दे, एवढंच मागणं आहे'…असे सांगताना पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल झालेल्या वारकर्यांच्या चेहर्यावर पेरणीची चिंता आणि दर्शनाचे समाधान असे संमिश्र भाव पाहायला मिळत होते. राज्याच्या कानाकोपर्यातून लाखो वारकरी टप्प्पाटप्प्याने पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत.
अनेक वारकर्यांनी दोन दिवस आधीपासून गोपाळपूर येथून विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या. दर्शनासाठी किमान 13 ते 14 तास रांगेत उभे राहावे लागत आहे. मात्र, विठूरायाच्या दर्शनाची आस लागलेल्या वारकरी बांधवांच्या चेहर्यावर थकव्याचा लवलेशही दिसत नव्हता. मुख्य गाभार्याकडे जाणार्या रांगांमधून पुढे सरकत असताना 'ज्ञानेश्वर माउली, ज्ञानराज माउली तुकाराम', 'ज्ञानोबा तुकाराम'चा गजर अखंडपणे सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. विठोबाच्या चरणी लीन होताना आबालवृध्दांना गहिवरून येत होते, दर्शनाने आयुष्याचे सार्थक झाल्याची भावना भाविकांनी 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केली.
दर्शनाने सगळा थकवा निघून गेला…
'पुढारी'शी बोलताना सुगावचे गावकरी प्रकाश टेकाळे म्हणाले, 'आम्ही आठ-दहा जण गेल्या पाच वर्षांपासून वारीला येत आहोत. यंदा सरपंच बंडू कारभारी शिंदेही सोबत आहेत. दहा-पंधरा दिवसांनी पंढरपुरात दाखल झालो आहोत. रात्री 2 वाजता रांगेत लागल्यावर तब्बल 15 तासांनी दर्शन होत आहे. मात्र, विठोबाच्या दर्शनाने सगळा थकवा निघून गेला आहे. विठोबाची कृपादृष्टी बळीराजावर कायम राहू दे, एवढीच प्रार्थना आहे.'
हे ही वाचा :