कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्या शाहू छत्रपती फुटबॉल लीगला मंगळवारपासून (दि. २७) सुरुवात होत आहे. (Kolhapur Football) विविध स्पर्धांच्या कारणास्तव लीगची तारीख तीन वेळा बदलण्याची वेळ आली होती. मात्र, ही प्रतिक्षा संपली असून मंगळवारी दुपारी २ वाजता फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ तर दुपारी ४ वाजता शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम यांच्यात सामने रंगणार आहेत. १६ वरीष्ठ फुटबॉल संघांमध्ये सुपर ८ व सिनीअर ८ अशा गटांमध्ये एकूण ५६ सामने रंगणार आहेत.
केएसएफने गेल्या महिन्याभरात तीन वेळा फुटबॉल लीग पुढे ढकलली. या निर्णयाबद्दल काही संघांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर मालोजीराजे यांनी शुक्रवारी छत्रपती शाहू स्टेडियमवर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मैदान गाजविणाऱ्या फुटबॉलपटूंच्या करिअरला केएसए ने सदैव प्राधान्य दिले आहे. याचाच एक भाग म्हणून सद्या राज्य व देशपातळीवर सुरू असणाऱ्या फुटबॉल स्पर्धांमध्ये सहभागी स्थानिक खेळाडूंचा विचार करून तसेच त्यांच्या संघांना विश्वासात घेऊनच फुटबॉल हंगामाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. २७ डिसेंबरपासून फुटबॉल हंगाम सुरू करण्यात येणार असल्याचे केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे यांनी सांगितले.
संतोष ट्रॉफीसाठी महाराष्ट्र राज्य पुरुष फुटबॉल संघ निवड चाचणी शिबिर, पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धांच्या तारखा अचानक जाहीर झाल्याने केएसए लाही काही निर्णय अचानक घ्यावे लागले. विद्यापीठाच्या विभागीय स्पर्धा, राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा आणि स्थानिक फुटबॉल हंगामाच्या तारखा पहिल्यांदाच एकाचवेळी आल्या. यामुळे केएसए ला खेळाडूंच्या करिअरसाठी काय महत्त्वाचे आहे. याचा विचार करून तारखा बदलाबाबतचा निर्णय घ्यावा लागल्याचे मालोजीराजे यांनी सांगितले.
हेही वाचा