एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांच्या बचावासाठी त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) आता समोर आली आहे. खोटे आरोप, ट्विटरबाजी करुन काही होणार नाही. आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत, असे आव्हान क्रांती रेडकर हिने दिले आहे. आरोप कोर्टात केलेले नाहीत. ट्विटर कोर्ट आहे का?. माझा नवरा खोटारडा नाही, रोज रोज काय स्पष्टीकरण द्यायचं? असे सवाल तिने केले आहेत.
नवाब मलिक यांनी नवीन एक ट्विट करत मोठा गौप्यस्फोट केला. निनावी नावाने एनसीबी अधिकाऱ्याकडून आलेल्या पत्राचा मजकूर नवाब मलिक यांनी ट्विटद्वारे उघड केला होता. त्यावर क्रांती रेडकरने घरात बसून असे कोणीही पत्र लिहू शकतो, असे उत्तर दिले आहे.
माझ्या नवऱ्यावरील सर्व आरोप चुकीचे आहेत. माझा नवरा खोटा नाही. समीर वानखेडेंच्या वडिलांनी याआधीच जन्मदाखला सादर केला आहे. मी मराठी असल्याचा अभिमान आहे. मी माझ्या राज्यात घाबरणार नाही. वानखेडे यांच्या विरोधातील लोक त्यांना विनाकारण त्रास देत आहेत, असा आरोप तिने केला आहे.
माझा पती, मुलांच्या जिवाला धोका आहे. आमच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने मला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. पण हे सगळे कोण करत आहे याचा शोध घेतला जात आहे. वानखेडे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत. ते प्रामाणिक अधिकारी आहेत. ते खुर्चीवरून हटावेत यासाठी त्यांना टार्गेट केले जात आहे. पण सत्याचा विजय होईल, असे क्रांतीने (Kranti Redkar) म्हटले आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात रोज नवीन नवीन गौफ्यस्फोट केले जात आहेत. या प्रकरणी अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. याच दरम्यान नवाब मलिक यांनी नवीन एक ट्विट करत मोठा गौप्यस्फोट केला. निनावी नावाने एनसीबी अधिकाऱ्याकडून आलेल्या पत्राचा मजकूर नवाब मलिक यांनी ट्विटद्वारे उघड केला. 'समीर वानखेडे यांना नेहमी मीडियात चर्चेत रहावे वाटते. यासाठी त्यांनी अनेक निर्दोष लोकांना एनडीपीएस केसमध्ये अडकवले आहे. खोट्या केसेस बनविण्यासाठी समीर वानखेडे यांनी आपली एक वेगळी टीम तयार केली आहे,' असे पत्रात नमूद केले आहे. ज्याने निनावी नावाने पत्र लिहिले आहे त्याने आपण एनसीबीचा एक कर्मचारी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.