कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा सुप्रीम कोर्टाने गायरान जमिनीवरील अतिक्रमणे हटवण्याच्या मोहीमेला एप्रिल महिन्यापर्यंत स्थगिती दिली आहे. राज्यात जिल्ह्यात तालुक्यात इतर कोणत्याही ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू नाही, मात्र अकिवाट आणि सैनिक टाकळी येथेच मोहीम राबवून आमच्यावर अन्याय का? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. सदरच्या जमिनीवर औद्योगिक वसाहत उभी करण्याचा शासनाचा घाट आम्ही कदापीही यशस्वी होऊ देणार नाही. याला आमचा विरोध आहे. असे सांगत शेतकरी आणि ग्रामस्थांनी अतिक्रमण हटाव मोहीम रोखून पाडली आहे.
दरम्यान या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण बनले असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. 15 एप्रिल पर्यंत अतिक्रमणे हटवू नयेत याबाबत वरिष्ठ कार्यालयातून आम्ही न्याय मागणार आहे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आल्याशिवाय आम्ही उठणार नाही अशी भूमिका घेत अधिकाऱ्यांना घेराव घातला आहे.
अकिवाट गायरान जमिनीतील शेवटच्या टप्प्याची गायरान जमिनी ताब्यात घेण्यासाठी महसुल प्रशासन, नगर भूमापन आणि पंचायत समितीच्या पथकाने लालू आवटी यांच्या शेतालगत पासून सकाळी 11 वाजता अतिक्रमण मोहिमेला सुरवात केली. यावेळी माजी सरपंच विशाल चौगुले, स्वाभिमानीचे विश्वास बालीघाटे, आंदोलन अंकुशचे दीपक पाटील यांनी सदरची मोहीम बंद पाडत, माजी सरपंच चौगुले यांनी दुष्काळा दरम्यान या परिसरातील शेतकऱ्यांना अधिक धान्य पिकवून धान्य संपत्ती निर्माण करण्यासाठी यासाठी शेतकऱ्यांना जमिनी दिल्या होत्या. या जमिनीवर सध्या औद्योगीकरणाचा घाट शासनाने रचला आहे. शासनाला आर्थिक उत्पन्नच हवे असेल तर याच शेतकऱ्यांना या जमिनी द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली.
आंदोलन अंकुशचे पाटील यांनी महाराष्ट्र राज्यातील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. मात्र एप्रिल 2023 पर्यंत त्याला स्थगिती दिली आहे. राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात इतर ठिकाणी कुठेच अतिक्रमण मोहीम राबवली जात नाही. मात्र अकिवाट आणि सैनिक टाकळी गायरान जमिनीवरच मोहीम का राबवली जात आहे? असा संतप्त सवाल उपस्थित करत राजकीय नेत्यांनी ही गायरान जमीन औद्योगीकरणाच्या नावाखाली घशात घालण्याचा घाट रचला आहे. सदरची मोहीम तात्काळ बंद करावी असे त्यांनी सांगितले.
संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. आंदोलकांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवा त्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही आणि तुम्हालाही सोडणार नाही अशी भूमिका घेत अधिकाऱ्यांना घेराव घातला आहे. यामुळे या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण बनले आहे.
हेही वाचा :