पुढारी ऑनलाईन डेस्क : 'फुटबॉल प्रेमी', असे बिरूद मिरणाऱ्या कोल्हापूर शहरातील फुटबाॅल चाहत्यांचे अनेक किस्से आहेत. कोल्हापूरात कुस्ती आणि फुटबॉल म्हणलं की, शहरातील क्रीडा रसिक मैदान हाऊसफुल्ल करतात. सध्या कोल्हापुरात शाहू स्टेडियमवर शिव-शाहू चषक सुरू आहे. स्पर्धेत मंगळवारी (दि.2) खंडोबा तालीम मंडळ आणि श्री वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात सामना खेळवण्यात आला. सामन्या दरम्यान वेताळमाळ संघाच्या चाहत्याने गोल मारण्यासाठी तब्बल तीन लाख रूपयांचे बक्षिस जाहीर केले. या बक्षीसाची चर्चा सध्या शहरात रंगली आहे. (Kolhapur Football)
शिव-शाहू स्पर्धेतील खंडोबा तालीम मंडळ आणि श्री वेताळमाळ तालीम यांच्यातील सामन्यात आपल्या संघाच्या खेळाडूने सामन्यात गोल मारावेत यासाठी फुटबॉलप्रेमी राजेंद्र साळोखे यांनी तब्बल 3 लाखांहून अधिक रुपयांची रोख बक्षिसे जाहीर केली. पहिला गोल खंडोबाकडून झाला. तो फेडण्यासाठी त्यांनी 51 हजार रुपये बक्षिसाची घोषणा केली. वेताळमाळच्या आकाश माळीने गोल नोंदवत हे बक्षीस पटकावले. यानंतर खंडोबाकडून दुसऱ्या गोलची नोंद झाली. वेताळकडून दुसर्या गोलसाठी पुन्हा साळोखे यांनी 1 लाख 1 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. हे बक्षीस सर्वेश वाडकरने गोल नोंदवून जिंकले.
सामना 2-2 बरोबरीत झाल्याने मैदानावर ईर्ष्या अधिकच वाढली. वेताळमाळकडून तिसरा गोल नोंदविणार्या खेळाडूसाठी 1 लाख 51 हजार रुपयांच्या बक्षिसाची घोषणा साळोखे यांनी केली; पण सामना संपेपर्यंत गोल न झाल्याने ते बक्षीस वेताळमाळ संघाला देण्यात आले. कोल्हापूरच्या फुटबॉल इतिहासात प्रथमच गोलसाठी 3 लाख रुपयांहून अधिकचे बक्षीस जाहीर झाल्याबद्दल फुटबॉलप्रेमींमधून आश्चर्य व्यक्त करण्यात आले. (Kolhapur Football)
संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित शिव-शाहू चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. मंगळवारी स्पर्धेतील तिसरा उपांत्यपूर्व सामना खंडोबा तालीम विरुद्ध वेताळमाळ तालीम यांच्यात रंगला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून जलद व आक्रमक खेळ झाला. सामन्याच्या पूर्वार्धात खंडोबाच्या प्रभू पोवारने गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात वेताळमाळच्या आकाश माळीने 56 व्या मिनिटाला गोलची परतफेड करून सामना 1-1 असा बरोबरीत केला. यानंतर खंडोबाच्या केवल कांबळेने 62 व्या मिनिटाला गोल नोंदवून पुन्हा 2-1 अशी आघाडी मिळविली. या गोलची परतफेड वेताळमाळच्या सर्वेश वाडकरने 73 व्या मिनिटाला केली. यामुळे संपूर्णवेळ सामना 2-2 असा बरोबरीत सुटला.
सामना बरोबरीत सुटल्याने निकालासाठी टायब—ेकरचा अवलंब करण्यात आला. टायब—ेकरमध्ये खंडोबाच्या संकेत मेढेने मारलेला स्ट्रोक गोलरक्षक आयुष चौगलेने रोखला. वेताळमाळच्या प्रथमेश कांबळेने मारलेला स्ट्रोक खंडोबाचा गोली अर्नेंदू दत्ताने रोखला. यानंतर खंडोबाच्या आदित्य लायकर, बिसाल टिग्गा, केवल कांबळे यांनी अचूक गोल केले. प्रभू पोवारने मारलेला फटका गोलरक्षक आयुष चौगलेने रोखला. उत्तरादाखल वेताळमाळकडून प्रणव कणसे, संदीप पोवार, प्रथमेश पाटील व यश चिक्रो यांनी अचूक गोल नोंदवून संघाला 4-3 असा विजय मिळवून दिला.
हेही वाचा :