कोल्हापूर : सतीश सरीकर
महापालिका निवडणुकीची प्रशासकीय पातळीवर धामधूम सुरू झाली आहे. अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. लवकरच आरक्षण सोडतही निघेल. राजकीय पक्षांतही इच्छुकांकडून रणधुमाळी सुरू झाली असून नेतेही तयारीला लागले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यासह भाजप व ताराराणी आघाडीतच महापालिकेवर सत्तेचा झेंडा फडकविण्यासाठी रणांगण रंगणार हे स्पष्ट आहे.
महाविकास आघाडी असली तरी महापालिका निवडणूक एकत्र लढण्याबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेत अद्यापही एकमत झालेले नाही. तीनही पक्षांच्या नेत्यांनी यापूर्वीच स्वतंत्र लढण्याचा निर्धार केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे स्वतंत्र लढून नंतर एकत्र येतील, असेच सध्याचे चित्र आहे. बंडखोरी टाळण्यावरच तिन्ही पक्षांचा भर आहे.
महापालिका सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबर 2020 ला संपली. कोरोनामुळे निवडणुका झाल्या नसल्या तरी प्रक्रिया मात्र सुरूच आहे. 2021 मध्ये निवडणुकीचे वातावरण तापले असताना काँग्रेसचे नेते व पालकमंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे नेते व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले होते. गेले वर्ष – दीड वर्षभर त्यांची वाटचाल त्याच दिशेने सुरू आहे. त्यानंतर गोकुळ, केडीसीसह विविध निवडणुकांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले.
गोकुळच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांत फाटाफूट होती. वैयक्तिक सोयीनुसार नेतेमंडळींकडून पक्षीय राजकारण झाले. तरीही महाविकास आघाडीने गोकुळची सत्ता मिळविली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र देऊनही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांना गेल्यावर्षी स्वीकृत संचालक म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतले नव्हते. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना यांच्यात धुसफूस सुरू झाली होती. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (केडीसी) निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळविणी केल्याने शिवसेनेने विरोधात शड्डू ठोकला. पालकमंत्री पाटील, ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्याविरुद्ध शिवसेनेचे खा. संजय मंडलिक यांच्यासह इतरांनी मोट बांधली होती. संपूर्ण महाराष्ट्राचे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्ता मिळविली. परंतु शिवसेनेने त्यांना घाम फोडल्याची स्थिती होती.
महापालिका सभागृहाची मुदत संपल्यापासून इच्छुकांनी अक्षरशः गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. एकेका प्रभागात अनेकजण इच्छुक आहेत. यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप-ताराराणी आघाडीकडील इच्छुकांचा समावेश आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांनी महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली निवडणूक लढविल्यास उमेदवारी न मिळालेले इच्छुक दुखावण्याची शक्यता आहे. परिणामी पक्षांतर्गत बंडखोरी वाढणार आहे. मातब्बर उमेदवार इतर पक्षांकडे जातील, अशी भीती नेतेमंडळी व्यक्त करत आहेत.