पाच दशकांत कोल्हापुरात 41 वेळा उष्णतेची लाट | पुढारी

पाच दशकांत कोल्हापुरात 41 वेळा उष्णतेची लाट

आशिष शिंदे
संपूर्ण देशभर वाढत्या उष्णतेचा कहर सुरू आहे. उत्तरेकडून महाराष्ट्रापर्यंत उष्णतेच्या लाटा सक्रिय होत आहेत. याचा तडाखा कोल्हापूरला देखील बसत असून रविवारी (दि. 8) जिल्ह्यात गेल्या चार वर्षांतील (40.3) उच्चांकी तापमानाची नोंद झाली. भारतीय हवामान संशोधन आणि सेवा कार्यालयाकडील आकडेवारीनुसार गत दहा वर्षांत (2012-2021) मे महिन्यात केवळ तीन वेळा कोल्हापूरचे तापमान 40 पार गेले आहे. याशिवाय गेल्या पाच दशकांत तब्बल 41 वेळा जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा फटका बसला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 9 मे 1988 रोजी उच्चांकी 42.3 इतक्या तापमानाची नोंद झाली होती. यानंतर गेल्या दहा वर्षांत 2013, 2016 आणि 2019 ला मे महिन्यात पारा 40 च्या पुढे गेला होता. यंदाही तापमान 40 पार गेल्याने नागरिकांची लाही लाही होत आहे. काँक्रिटचे जंगल, सिमेंटचे रस्ते आणि मोठ्या प्रमाणात झालेली झाडांची कत्तल यामुळे हा हवामान बदलाचा फटका कोल्हापूरला सहन करावा लागत असल्याची शक्यता पर्यावरण तज्ज्ज्ञांनी व्यक्‍त केली आहे.

दहा वर्षांतील
मे महिन्यातील तापमान

वर्ष      कमाल     किमान
2021    36.8         25.5
2020    39.6         30.9
2019    41.2         33.4
2018    39.1         31.8
2017    39.8         31.4
2016    41.1         33.3
2015    39.0         29.5
2014    38.2         30.8
2013    40.3         26.9
2012    39.5         30.8

वाढता उष्मा आणि बिघडलेले पावसाचे गणित हे देखील बदलत्या पर्यावरणाचे संकेत आहेत. तापमान वाढ रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्रीन बेल्ट तयार करण्याची गरज आहे. याशिवाय ग्रीन वायू उत्सर्जन रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
– अनिल चौगुले,
कार्यवाह, निसर्गमित्र

 

Back to top button