उदगाव: पुढारी वृत्तसेवा : अर्जुनवाड (ता.शिरोळ) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच स्वाती कोळी व उपसरपंच रमेश बसर्गी यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी आणलेल्या अविश्वास ठराव १० विरुद्ध ३ अशा मतांनी मंजूर झाला. तहसिलदार अनिलकुमार हेळकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा आज (दि.१) सकाळी व दुपारी झाली. सरपंच व उपसरपंच यांनी गेल्या एक महिन्यापूर्वीच आमदार यड्रावकर गटात प्रवेश केला होता. दरम्यान, या अविश्वास ठराव मंजुरीमुळे उदगावपाठोपाठ अर्जुनवाड येथेही आमदार यड्रावकर गटाला मोठा धक्का बसला आहे. Kolhapur News
अर्जुनवाड ग्रामपंचायत निवडणूक २०२१ मध्ये झाली होती. यामध्ये माजी आमदार उल्हास पाटील गटाला ६ व आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, गणपतराव पाटील गटाचे ७ सदस्य निवडून आले होते. मात्र, सरपंच, उपसरपंच निवडीवेळी यड्रावकर गटाचा १ उमेदवार फुटल्याने त्यावेळी उल्हास पाटील गटाचा सरपंच, उपसरपंच झाला होता. Kolhapur News
दरम्यान, एक महिन्यापूर्वी सरपंच, उपसरपंचसह २ सदस्यांनी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर गटात प्रवेश केला होता. त्यातील दोन सदस्यांनी माजी आमदार उल्हास पाटील गटात परत सामील झाल्याने पाटील गटाने सर्वांची मोट बांधत सरपंचाविरोधात पतीचा कामात हस्तक्षेप, मनमानी कारभार व उपसरपंच विरोधात सदस्यांना विश्वासात न घेता कामे व पदाचा गैरवापर केल्याचे कारण दाखवून ग्रामपंचायत सदस्य शंकर उर्फ संतोष दुधाळे, विकास पाटील, संतोष पाटील, परशराम बागडी, शोभा डोंगरे, शोभा कोळी, भारती परीट, अर्चना थोरात, संगिता चौगुले, नंदाताई खोत यांनी तहसिलदार यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता.
तहसिलदार अनिलकुमार हेळकर यांनी आज सकाळी ११ वाजता सरपंच यांच्यावर अविश्वास ठरावासाठी तर उपसरपंच यांच्यावरील अविश्वास ठरावासाठी दुपारी ३ वाजता विशेष सभा घेतली. या सभेत १० विरुद्ध ३ असा अविश्वास ठराव मंजूर झाला. सरपंच व उपसरपंच दोघांच्यावरही अविश्वास ठराव मंजूर होण्याची शिरोळ तालुक्यात ही पहिलीच घटना आहे. यावेळी मंडल अधिकारी अविनाश सुर्यवंशी, ग्रामसेवक अनिल बिडकर, तलाठी उमेश माळी, पोलिस पाटील सचिन कांबळे, महादेव पवार, नंदकुमार पाटील उपस्थित होते.
गावाच्या विकासाला चालना मिळावी, यासाठी ग्रामपंचायतीचा कारभार सुरु होता. मात्र, सरपंच व उपसरपंच यांच्या मनमानी कारभारामुळे १० सदस्यांनी एकत्रित येत सरपंच व उपसरपंच यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता. आज झालेल्या विशेष सभेत सरपंच व उपसरपंच यांच्यावर १० विरूध्द ३ मताने अविश्वास ठराव मंजूर झाला.
-विकास पाटील, गटनेते व ग्रामपंचायत सदस्य अर्जुनवाड
हेही वाचा