पुढारी ऑनलाईन
मुलगी झाली हो या छोट्या पड़द्यावरील अभिनेते किरण माने उर्फ विलास पाटील यांचा वाद अद्यापही मिटलेला नाही. मी उद्या मुंबईत प्रेस कॉन्फरन्स घेतोय अशी पोस्ट त्यांनी काल त्यांच्या फेसबूक पेजवर शेअर केली होती. आता आजदेखील त्यांनी एक नवी पोस्ट फेसबूकवर शेअर केली आहे. किरण माने यांनी आपला संतापदेखील या पोस्टमधून व्यक्त केला आहे. त्यांनी एक फोटो शेअर करत भलीमोठी पोस्टदेखील लिहिलीय.
ते आज दुपारी साडेतीन वाजता वकील असिम सरोदे यांच्या सोबत पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये काय लिहिलंय पाहा-
आज दुपारी ३.३० वाजता प्रेस काॅन्फरन्स घेतोय. मुंबई प्रेस क्लबला. मी आणि माझे वकील असिम सरोदे
समस्त मराठी कलाकारांनो, मी तुमच्यासाठी लढतोय.
…एक कलाकार म्हणून तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहीले असाल किंवा नसाल.
…तुम्ही पुरोगामी असाल-प्रतिगामी असाल किंवा 'सोयिस्कर' तटस्थ असाल.
…तुम्ही माझा द्वेष करत असाल किंवा तुम्हाला माझ्याबद्दल 'सहवेदना' असेल.
…तुम्हाला माझी बाजू पटत असेल किंवा तुम्ही माझ्या विरोधकांच्या बाजूनं असाल किंवा कन्फ्यूज्ड असाल.
काहीही असेल, तरीही हा #किरण_माने_पॅटर्न तुमच्या सुरक्षिततेसाठी आहे.
…तुम्ही स्ट्रगलर असाल किंवा नांववाले असाल, तरी मी 'तुमच्या' हक्कासाठी लढतोय हे लक्षात ठेवा. #किरण_माने_पॅटर्न कलाकारांच्या न होणार्या एकजुटीला पर्याय आहे.
…माझ्या लढाईत मी जिंकल्यानंतर, तुम्हाला एका फोनवर "उद्यापासून तू या सिरीयलमध्ये-नाटकात नसशील." असं सांगायची कुठलंच प्राॅडक्शन हाऊस हिम्मत करणार नाही.
…तुम्ही स्त्री असाल तर कुठलाही पुरूष तुमच्याशी सेटवर गैरवर्तन करायला धजावणार नाही.
…तुम्ही पुरूष असाल तर तुमचा कुठलाही हितशत्रू, कुठल्याही स्त्रीच्या आडून तुमच्यावर खोट्या-बेसलेस 'गैरवर्तना'च्या आरोपाचं कटकारस्थान करण्याची हिम्मत करणार नाही. कुठलीही भगिनी कुणावरही खोटे आरोप करताना हज्जार वेळा विचार करेल.
…सेटवर सर्वांसमोर तुमची जात उघड करताना तुम्हाला लाज वाटणार नाही. किंवा कुणी तुमच्यापुढे आपल्या जातीचा तोराही मिरवायची छाती करणार नाही. जातपात हा प्रकार बाजूला ठेवून फक्त माणूस आणि त्याची गुणवत्ता जोखली जायला सुरूवात होईल.
…आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तुमची जी काही विचारधारा असेल-राजकीय विधानं असतील, ती सोशल मिडीयावर मांडण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. तुमचा 'आवाज' दाबायला कोण माईचा लाल समोर येणार नाही !!!
मी आणि माझे वकील असिम सरोदे अशा तीन कायदेशीर बाबींवर बोलणार आहोत, ज्या आपल्या क्षेत्रात कायम दुर्लक्षिल्या गेल्यात. पण आता माझ्यामुळे ते कायदे प्राॅडक्शन हाऊसला अतिशय अडचणीत आणणार आहेत. सगळी शक्ती पणाला लावूनही त्यातून मार्ग काढणं त्यांना महामुश्कील होणार आहे. हे मुद्दे माझ्या केसला 'युनिव्हर्सल' बनवतात. तुम्ही या क्षेत्रातले आहात. तुम्हाला माहितीये मी कुणाशी लढतोय. माझ्या करीयरचा बळी जाऊ शकतो. पण नंतर तुम्ही 'तरणार' आहात हे लक्षात घ्या.
…दूसरं – काही हिंदी प्राॅडक्शन हाऊसेसनी मराठीत येऊन खुप घाण केलेली आहे. त्यांचे 'हेड ऑफ प्राॅडक्शन' आणि 'प्राॅडक्शन कंट्रोलर' अशा पोस्टवरची अनेक ऐशआरामी-छंदीफंदी-व्यसनी 'रंगीले रतन' मराठीतलं 'चालचलन' बिघडवतायत… त्या माजोरड्यांना हा मेसेज गेला पायजे की एखादा 'मराठी कलाकार' नडला तर तुमचा बाजार उठवंल ! मन लावून काम करू…मेहनतीला कमी नाय पडणार.. पण तुमच्या काळ्या कृत्यांना मोकळं रान मिळावं म्हणून प्रामाणिक कलाकाराला विनाकारण छळू पहाल-दडपू पहाल, तर हा महाराष्ट्र आहे भावांनो !! छ.शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकरांनी आमच्या हक्कांसाठी आयुष्य खर्ची घातलंय… आम्ही त्यांच्या विचारांचे
पाईक आहोत… आमचा नाद करू नका.
जय जिजाऊ.. जय शिवराय… जयभिम… तुकाराम महाराज की जय !
#किरण_माने_पॅटर्न #kiranmane_pattern