मंगळूर; पुढारी ऑनलाईन : कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेल्लारे येथे मंगळवारी रात्री भाजप युवा मोर्चाचे नेते प्रवीणकुमार नेत्तर यांची हत्या झाली होती. त्यानंतर मंगळूर शहराच्या बाहेरील सुरतकल येथे एका कापड दुकानाबाहेर गुरुवारी सायंकाळी अज्ञात हल्लेखोरांच्या टोळक्याने आणखी एका २३ वर्षीय तरुणाची हत्या केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सुरतकल, पानंबूर, मुल्की आणि बाजपे पोलिस स्टेशनच्या हद्दीत कलम १४४ अंतर्गत ३० जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. तसेच चार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळांही बंद ठेवण्यात आल्या आहेत.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे बेळ्ळारे येथील भाजप युवा आघाडीचे नेते प्रवीण नेत्तर यांच्या घरी आज भेट देत असताना ही घटना घडली. मोहम्मद फजिल असे मृत तरुणाचे नाव असून तो सुरतकलजवळील मंगलपेटे येथील रहिवासी आहे. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता आणि त्याला रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. मंगळूर शहर पोलिस आयुक्त एन शशी कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की तीन ते चार हल्लेखोरांनी तरुणावर धारधार शस्त्राने हल्ला केला. या प्रकरणी सुरतकल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणत्याही अफवा पसरवू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.
"मी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्षदर्शींशी बोललो. या हल्ल्यामागचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरतकल, पानंबूर, मुल्की आणि बाजपे पोलिस स्टेशनच्या हद्दीत कलम १४४ अंतर्गत ३० जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या भागात शुक्रवारी सर्व दारूची दुकाने बंद राहतील. आवश्यकता वाटल्यास प्रतिबंधात्मक आदेश इतर ठिकाणी लागू केले जातील," असे मंगळूर शहर पोलिस आयुक्त एन शशी कुमार यांनी सागितले.
मंगळूर आयुक्तालयाच्या हद्दीत १९ चेकपोस्ट उभारण्यात आल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे. चार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळांही बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. गँगने फजिलचा पाठलाग करुन त्याला पकडले आणि त्याला बेदम मारहाण केली.
मंगळूरमधील भाजप युवा मोर्चाचे नेते प्रवीणकुमार नेत्तर याच्या हत्येप्रकरणी दोघा संशयितांना केरळमध्ये अटक करण्यात आली आहे. तर एकूण 21 जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. मोहम्मद रफीक, झाकीर अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या दोघांसह ताब्यात घेतलेले 21 जण एसडीपीआय, पीएफआय संघटनेचे आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस अधिकारी अलोककुमार यांच्या नेतृत्वाखाली होत आहे.
मंगळूरमधील सुळ्या तालुक्यातील बेळ्ळारे येथे जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. गुरुवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई घटनास्थळी पाहणी करणार होते. शिवाय प्रवीणकुमार यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार होते. पण, त्यांचा दौरा रद्द झाला. हा दौरा शुक्रवारी होत आहे.
भाजप सत्तेवर येऊन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दोड्डबळ्ळापूर येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. पण, मंगळूर येथे भाजप युवा मोर्चाच्या नेत्याची हत्या झाल्याने हा मेळावा रद्द करण्यात आला. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हा निर्णय जाहीर केला. येथे पत्रकारांशी बोलत होते. हत्या झाल्यानंतर धक्का बसला. शिमोगा येथील हर्ष याच्या हत्येप्रमाणेच प्रवीण यांची हत्या झाली. काहीजण शांतता आणि जातीतील सलोखा बिघवडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकरणांमध्ये गुंतलेल्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. पीएफआय, एसडीपीआय संघटनांकडून अशा प्रकारच्या कारवाया होत असल्याचे दिसू आले आहे. त्या संघटनांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल.