मंगळूर : पुढारी वृत्तसेवा श्रीलंकेतून बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी केलेल्या 44 श्रीलंकन नागरिकांना मंगळूर पोलिसांनी अटक केली. ते सर्वजण तामिळनाडूतून समुद्रमार्गाने मंगळूर येथे दाखल झाले होते. तेथून ते कॅनडाला जाणार होते. हा प्रकार म्हणजे मानव तस्करी असल्याचे तपासात उघड झाले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने कर्नाटकसह विविध ठिकाणी लॉकडाऊन जारी करण्यात आला. त्यामुळे अटकेतील सर्वजण गेल्या दोन महिन्यांपासून बंगळूरात वास्तव्यास होते. त्या सर्वांना मंगळुरातील सुमारे सातजण मदत करत असल्याची माहिती मिळाली आहे. त्या सर्वांना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिस आयुक्त शशिकुमार यांनी दिली आहे.
अटकेतील सर्वजण कॅनडाला जाणार होते. त्यांच्याकडे पासपोर्ट व्हिसा किंवा इतर आवश्यक कागदपत्रे सापडली नाहीत. ते सर्वजण मंगळुरात प्रवेश केल्यानंतर कर्नाटकात लॉकडाऊन जारी करण्यात आला. त्यामुळे सर्वजण इथेच अडकून पडले. त्या सर्वांना कॅनडामध्ये बेकायदेशीरपणे पाठवण्यात येणार होते. मानवी तस्करीचा हा प्रकार असल्याचे उघड झाले आहे.
12 मार्च रोजी सर्व 44 जण प्रत्येकी सुमारे तीन लाख रुपये एजंटांना देऊन तामिळनाडूत दाखल झाले. एजंटांनी त्यांना कॅनडामध्ये नोकरीचे आमिष दाखवले होते. तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक असल्याने काही दिवस त्यांना तेथे थांबावे लागले. कंटेनर, कार्गो शिप किंवा खासगी बोटीतून त्यांना चोरट्या मार्गाने कॅनडाला नेण्याची योजना होती. अटक केलेल्यांनी दिलेल्या माहितीनुसार याआधी काहीजण श्रीलंकेतून कॅनडाला गेले होते. ते सर्वजण तेथे छोटे मोठे काम मिळवून स्थिर झाले आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून श्रीलंकेहून मंगळूरमार्गे कॅनडाला मानवी तस्करी होत असल्याचे दिसून आले आहे.
तामिळनाडूत दाखल झाल्यानंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी लॉजमध्ये राहत होते. मदुराई सालेममध्ये काही दिवस वास्तव्य करून ते मंगळूरला गेले काही दिवस त्यांनी मंगळुरात राहून मच्छीमारीचे काम केल्याचे समजते.
तपासासाठी विशेष पथक
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष पथक स्थापन केले आहे. तामिळनाडू पोलिसांशी संपर्क साधून याबाबतचा तपास होणार आहे. सहा स्थानिक नागरिकांना या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. मानवी तस्करीसाठी त्यांनी मदत केल्याचा आरोप आहे.
कर्नाटकमार्गे तस्करी
दोनच दिवसांपूर्वी कारवारमधील भटकळ येथे पाकिस्तानी महिला महिलेला अटक करण्यात आली होती. तीसुद्धा चोरट्या मार्गाने भारतात आली होती. यानंतर दोनच दिवसांत तब्बल 44 श्रीलंकन मंगळूर येथे सापडल्याने खळबळ उडाली आहे. विविध देशांमध्ये होणारी मानवी तस्करी कर्नाटकमार्गे होत आहे का? याबाबत तपास सुरू झाला आहे.