पानसरे हत्या ः सर्व संशयित हजर नसल्याने दोषनिश्‍चिती लांबणीवर पुढील सुनावणी 5 ऑगस्टला | पुढारी

पानसरे हत्या ः सर्व संशयित हजर नसल्याने दोषनिश्‍चिती लांबणीवर पुढील सुनावणी 5 ऑगस्टला

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी बारा संशयितांविरोधात दोषनिश्‍चिती करण्यात येणार होती. त्यापकी सारंग अकोळकर व विनय पवार हे दोघे बेपत्ता आहेत. उर्वरित दहापैकी केवळ चारच संशयितांना बुधवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. इतर संशयितांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात येणार होते. आरोपींच्या वकिलांनी याला आक्षेप घेत सर्व संशयितांना न्यायालयात हजर करूनच दोष निश्‍चिती करावी, असे म्हणणे मांडले. यावर पुढील सुनावणीवेळी सर्व संशयितांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी दिले. पुढील सुनावणी 5 ऑगस्ट रोजी होणार आहे.

पानसरे हत्येप्रकरणी बारा संशयितांवर दोष निश्‍चिती केली जाणार आहे. यामध्ये मुख्य संशयित समीर गायकवाड, डॉ. विरेंद्रसिंह तावडे, विनय पवार, सारंग अकोळकर, अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशी, भारत कुरणे, अमित डेगवेकर, शरद कळसकर, सचिन अंदूरे, अमित बद्वी, गणेश मिस्कीन अशा बारा जणांचा समावेश आहे.

चौघे न्यायालयासमोर हजर

दोष निश्‍चितीसाठी बुधवारी जिल्हा न्यायालयात येरवडा जेलमधून डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर, सचिन अंदूरे या तिघांना आणण्यात आले. जामिनावर सुटलेला समीर गायकवाडही हजर होता. आरोपींचे वकील समीर पटवर्धन यांनी दोष निश्‍चितीपूर्वी सर्व संशयितांसोबत बोलणे गरजेचे आहे. सर्व संशयित वेगवेगळ्या कारागृहात असल्याने त्यांच्याशी बोलण्याकरिता पुरेसा वेळ मिळत नसल्याचे म्हणणे मांडले. सर्व संशयितांना एकाचवेळी हजर करण्यात यावे. तसेच त्यांच्याशी बोलण्याची मुभा द्यावी, अशी मागणी केली. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी इतर संशयितांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यातच येणार असल्याचा युक्‍तिवाद केला.

सर्व संशयितांना हजर करा

पानसरे हत्येप्रकरणी बारा जणांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. समीर गायकवाड हा केवळ पानसरे हत्येप्रकरणी संशयित आहे तर इतर संशयित हे डॉ. नरेंद्र दाभोळकर, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश अशा वेगवेगळ्या हत्यांमधील संशयित म्हणून कारागृहात आहेत. या सर्व दहा जणांना 5 ऑगस्टच्या सुनावणीवेळी एकत्रितपणे हजर करण्याचे आदेश न्यायाधीश तांबे यांनी बुधवारी दिले.

हेही वाचा

Back to top button