पुढारी ऑनलाईन डेस्क : सर्व आई-वडील आपल्या मुलीचं लग्न मोठ्या थाटामाटात करतात. मुलीचा संसार सुखाचा व्हावा, अशी भावना प्रत्येक आई-वडिलांची असते, म्हणूनच वाजत-गाजत मुलीला सासरी पाठवतात. पण उत्तर प्रदेशातील कानपूर येथील एका वडिलाने घटस्फोटानंतरही आपल्या मुलीला बँडबाजा लावून वाजत-गाजत घरी आणले. जाणून घ्या काय आहे प्रकरण…
संबंधित बातम्या :
कानपूर येथील अनिल कुमार हे बीएसएनएलमध्ये काम करतात. त्यांची मुलगी उर्वी ३६ वर्षांची असून ती नवी दिल्लीतील पालम विमानतळावर अभियंता आहे. तिने २०१६ मध्ये एका संगणक अभियंत्याशी लग्न केले. हे जोडपे दिल्लीत राहत होते आणि दोघांना एक मुलगी आहे. उर्वीचे सासरचे लोक तिला हुंड्यासाठी त्रास देत होते. त्यामुळे त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाने २८ फेब्रुवारी रोजी या जोडप्याला घटस्फोट दिला होता. याबाबत बोलताना उर्वी म्हणाली, "मी माझे नाते वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण ८ वर्षे मारहाण, टोमणे आणि छळ सहन केल्यानंतर मी पूर्णपणे तुटले होते."
वडील अनिल यांनी सांगितले की, मुलीच्या लग्नानंतर आई-वडील तिच्याकडे दुर्लक्ष करतात. मुलीला आणि तिच्या समस्यांना समजून घेत नाहीत. म्हणून मुलीला घरी आणताना मी बँडबाजा बोलावला होता, कारण मला परिसरात राहणाऱ्या लोकांना सकारात्मक संदेश द्यायचा होता. आम्ही आमच्या मुलीला ज्याप्रमाणे तिच्या लग्नानंतर निरोप दिला होता, त्याचप्रमाणे तिला परत आणले आहे. तिने तिचे आयुष्य सन्मानाने जगावे अशी आमची इच्छा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :