Pune News : घटस्फोट नव्हे आता लग्नच रद्द! | पुढारी

Pune News : घटस्फोट नव्हे आता लग्नच रद्द!

शंकर कवडे

पुणे : पतीचे पहिले लग्न झाले आहे…, पत्नीने घटस्फोट न घेता दुसरे लग्न केले आहे…, पत्नी त्रयस्थ व्यक्तीपासून गरोदर आहे…, पती वैवाहिक शारीरिक संबंध ठेवण्यास सक्षम नाही…, पतीला डोळ्यांनी स्पष्ट दिसत नाही… आदी नवदाम्पत्याचे आरोप सध्या कौटुंबिक न्यायालयात चर्चेचा विषय ठरत आहेत. जोडीदाराने पुन्हा एकत्र यावे, पोटगी, घटस्फोटासह आत्ता लग्न रद्द करण्यासाठीही पती-पत्नी न्यायालयात धाव घेऊ लागले आहेत. मागील दहा महिन्यांत खोटी माहिती देऊन लग्न केल्याप्रकरणातील 79 जोडप्यांपैकी 55 जणांची लग्नेच बेकायदेशीर ठरवत न्यायालयाने ती रद्दही केली आहेत.

आयुष्यभर एकत्र राहण्याचा आणि कुटुंब सुरू करण्याचा निर्णय घेत दोन व्यक्ती एकत्र येत विवाहास संमती देऊन लग्नास तयार होतात. लग्न ठरवताना वधू व वर पक्षाकडून आपली सर्वोत्तम बाजू पाहुण्यांसमोर मांडली जाते. काही गोष्टी विवाह मंडळाला दिलेल्या लिखित माहितीत दिल्या जातात, तर काही माहिती प्रत्यक्ष भेटीत तोंडी सांगितली जाते. लग्न जुळविण्यात येत असल्याने पुढच्या गोष्टीचा या वेळी सुतरामही विचार केला जात नाही. लग्न झालं, की लोक चालवून घेतील, असे वाटत असावे किंवा गाजराची पुंगी वाजली तर वाजली असे म्हणत लोक धोका पत्करतात.

मात्र, वर्षभरातच या गोष्टींचा उलगडा होतो अन् फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर काही जण न्यायालयाची पायरी चढतात. या वेळी जोडीदाराकडून घटस्फोट घेण्याऐवजी लग्न रद्द करण्यासाठी अर्ज केला जातो. न्यायालयाने अर्जास मंजुरी दिल्यास त्यानंतर केलेले लग्न हे लौकिकार्थाने दुसरे असले, तरी कायद्याच्या नजरेत पहिलेच ठरते. तसेच, घटस्फोटाचा शिक्काही टळून पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करताना अडचणीही उद्भवत नसल्याने या अर्जांचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.

  • ’मॅरेज कॅन्सल’साठी दहा महिन्यांत 79 जोडप्यांचा अर्ज
  • कौटुंबिक न्यायालयाकडून 55 जोडीदारांना दिलासा

अन्यथा लग्न रद्द करण्याच्या अर्जास न्यायालयाचा नकार

लग्नानंतर याप्रकारची फसवणूक झाल्याचे कळाल्यानंतर एक वर्षाच्या आत कौटुंबिक न्यायालयात दावा केला पाहिजे. याखेरीज, स्वच्छेने जोडीदाराशी वैवाहिक संबंध पूर्णपणे थांबवणे आवश्यक आहेत. फसवणूक झाल्याचे कळल्यावरही पती-पत्नीने सामान्य वैवाहिक संबंध चालू ठेवले, तर याचा अर्थ जोडीदाराने केलेली चूक माफ केली आणि जबाबदारी जोडीदाराच्या उणिवेसह स्वीकारली आहे, असा होतो. अशा परिस्थितीत लग्न रद्द ठरवण्याचा अर्ज न्यायालय नाकारू शकते.

हिंदू विवाह कायदा कलम पाचमधील महत्त्वाच्या अटी

  • जोडीदारांपैकी दोघांचेही पूर्वी लग्न झालेले नसावे
  • लग्न झाले असल्यास घटस्फोट झालेला असावा
  • विवाहास दोघांची संमती असावी
  • दोघेही शारीरिक, मानसिकदृष्ट्या सुदृढ असावेत
  • ते वैवाहिक शारीरिक संबंध ठेवू शकतील
  • त्यांच्यात कोणत्याही शारीरिक उणिवा नसाव्यात
  • दोघांचे वय कायद्याप्रमाणे योग्य असावे
  • वधू आणि वरात मामा, काका, मावशीचा मुलगा, चुलत भाऊ असे नाते नसावे

लग्नाच्या वेळी स्वतःबद्दल संपूर्ण माहिती न देणे, कमतरता आणि अवगुण लपवणे याद्वारे आपण दुसर्‍याला फसवत आहोत हे अनेकांना वाटत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. बहुतांश प्रकरणात लग्न झाल्यावर आपोआप कळेलच असा विचार केला जातो. या सर्व गोष्टींमुळे व्यावहारिक नुकसान होतेच शिवाय दोन्ही पक्षांचे भरून न येणारे भावनिक नुकसान होते.

– अ‍ॅड. धैर्यशील पाटील

चूक नसतानाही जोडीदारांकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर लग्न रद्द करण्यासाठी अर्ज केला जातो. घटस्फोट घेतल्यानंतर ’घटस्फोटीत’ असा शिक्का पडतो. मात्र, याप्रकरणात घटस्फोटाचा शिक्काही टळून पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करताना अडचणीही उद्भवत नाहीत. सद्यस्थितीत कौटुंबिक न्यायालयात या अर्जांचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढत आहे.

– अ‍ॅड. आकाश मुसळे

हेही वाचा

विकास निधीचे ढपले पाडणार्‍या बोक्यांना हद्दपार करा

Pune News : कर विभागाकडे बंद प्रकल्पांची माहितीच नाही

समाजभान : मुलांच्या मानेवर अपेक्षांचे ओझे

 

Back to top button