पुणे : चाळीस तोळे सोन्याचे दागिने घेऊन सोनारानेच केला पोबारा

पुणे : चाळीस तोळे सोन्याचे दागिने घेऊन सोनारानेच केला पोबारा

पुणे, पुढारी वृत्तसेवा : बांधकाम व्यावसायीकासह आणखी काही नागरिकांचे सोन्याचे दागिने दुरुस्त करण्यासाठी घेऊन सराफाने सुमारे 40 तोळे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात सराफावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनिल जगदीश वर्मा (41, रा. वेस्ट कोस्ट, शिवणे) या सराफावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सोमनाथ मार्तंड इंगवले (41, रा. शुभ कल्याण, नांदेड सिटी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी सोमनाथ इंगवले हे बांधकाम व्यावसायीक आहेत; तर संशयीत आरोपी सुनिल वर्मा याचे शिवणे येथील नांदेडसिटी रोडवर स्वामी सानिध्य विहारमध्ये गणराज ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे.

सुनिल वर्मा याने इंगवले यांच्याकडून अडीच लाखांचे तब्बल दहा तोळे सोन्याचे दागिने दुरुस्त करून देण्याचे बहाण्याने घेतले. त्याच बरोबर त्यांच्याच परिचयाचे आकाश घुले, तुषार नाणेकर तसेच इतर आठ ते दहा जणांकडून तब्बल 40 तोळ्याहून अधिक सोन्याचे दागिने दुरुस्त करण्यासाठी घेतले. त्यानंतर लगेचच हा सराफ आपल्या दुकानाला टाळे ठोकून पसार झाल्याचा प्रकार घडला. फिर्यादी दागिने आणण्यासाठी दुकानात गेले; तसेच सराफाशी विविध मार्गाने संपर्क होतो का हे पाहिले परंतु, सराफाशी कोणताही संपर्क न झाल्याने फिर्यादींनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे.

फिर्यादी व अन्य आठ ते दहा जणांनी त्यांच्याकडील सोन्याचे दागिने सराफाकडे दुरूस्त करण्यासाठी दिले होते. परंतु, सराफाने ते दागिने दुरूस्त करून देणे गरजेचे असताना तो दुकान बंद करून फरार झाल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सुमारे 30 ते 40 तोळे सोन्याचा अपहार झाल्याचा अंदाज आहे. आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत.

                             – यु. डी. रोकडे, सहायक पोलिस निरीक्षक, उत्तमनगर पोलिस ठाणे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news