Japan earthquake : जपान भूकंपबळींची संख्या १०० वर, ४५० हून अधिक जखमी, २११ बेपत्ता
पुढारी ऑनलाईन डेस्क: जपानमध्ये पाच दिवसांपूर्वी झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या १०० वर पोहोचली आहे. बचावकर्ते अजूनही ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपातील मृतांची संख्या वाढणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जपानच्या मुख्य होन्शू बेटावरील इशिकावा भागात २११ लोक अजूनही बेपत्ता आहेत, असे वृत्त 'रॉयर्स'ने दिले आहे. (Japan earthquake)
खराब हवामानामुळे हजारो बचाव कर्मचार्यांच्या कामात अडथळे आले. दरम्यान रविवारी बर्फावृष्टीचा अंदाज होता. मदतकार्यादरम्यान तुटलेले रस्ते, खड्डे आणि पडलेली झाडे आणि खडकांचा बचावकर्त्यांना सामना करावा लागत आहे. गुरुवारी (दि.४) दोन वृद्ध महिलांना त्यांच्या घराच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश आल्याचे देखील बचाव कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. (Japan earthquake)
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानवर संकट ओढावले. २०२४ च्या पहिल्या दिवशी जपानमध्ये १५५ जोरदार भूकंपाचे धक्के बसले. या भूकंप दुर्घटना मालिकेत सुमारे १०० लोकांचा मृत्यू झाला आहे. राजधानी टोकियोपासून सुमारे ३०० कि. मी. (१९० मैल) अंतरावरील नोटो द्वीपकल्पाजवळ सोमवारी झालेल्या ७.६ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपानंतर जपानने संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर त्सुनामीचा इशारा जारी केला होता. इशिकावा येथील नोटोच्या किनारपट्टीवर पाच मीटर उंच लाटा उसळल्या असून, नैसर्गिक आपत्तीमुळे ३३ हजारांहून अधिक घरांतील वीज आणि पाणीपुरवठा खंडित झाला होता. (Japan earthquake)