Tsunami Alert : जपान हादरले ; ७.५ रिश्टर भूकंपानंतर, त्सुनामीचा इशारा | पुढारी

Tsunami Alert : जपान हादरले ; ७.५ रिश्टर भूकंपानंतर, त्सुनामीचा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : जपामनच्या ईशान्येकडील भागात ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. यानंतर जपानला त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे, असे वृत्त ‘द असोसिएट्स प्रेस’चा हवाला देत ‘पीटीआय’ने दिले आहे. (Tsunami Alert)

उत्तर-मध्य जपानमध्ये आज ( दि.१)  ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. जपानच्या हवामान संस्थेने जपानमधील इशिकावा, निगाता आणि तोयामा प्रीफेक्चर्सच्या किनारपट्टीवर त्सुनामीची चेतावणी जारी केली आहे. जोरदार भूकंपाच्या मालिकेने जपानचा पश्चिम भाग हादरला आहे. मात्र आतापर्यंत कोणतेही नुकसान किंवा जीवितहानी झालेली नसल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.

हवामान खात्याशी संबंधित जपानी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनामीमुळे समुद्राच्या लाटा ५ मीटर उंचीपर्यंत उसळू शकतात. त्यामुळे लोकांना लवकरात लवकर उंच जमिनीवर किंवा जवळच्या इमारतीच्या माथ्यावर जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे, असेही माध्यमांनी वृत्त दिले आहे.

यापूर्वी सलग दोनवेळा भूकंपाचे धक्के

गुरूवारी (२८ डिसेंबर) जपानच्या किनारी भागात दुपारी भूकंपाचे सलग दोन धक्के बसले होते. पहिल्या भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर तर दुसऱ्या भूकंपाची तीव्रता ५.० रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली हाेती. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, जपानमधील कुरिल बेटांवर गुरुवारी दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का नोंदवण्यात आला, तर दुसरा धक्का दुपारी ३ वाजून ७ मिनिटाच्या सुमारास नोंदवण्यात आला. (Earthquake in Japan)

हेही वाचा :

Back to top button