जळगाव : जिल्हा प्रशासनाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घातले पिंडदान

जळगाव : जिल्हा प्रशासनाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घातले पिंडदान

जळगाव : पुढारी वृत्तसेवा, जिल्ह्यामधील 77 हजार 920 शेतकऱ्यांनी पिक विमा काढला होता.  या पिक विम्याचा कालावधी संपुष्टात येऊनही लाभार्थी शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. जिल्हा प्रशासनाच्या नाकर्ते पणामुळे पीक पडताळणी रखडलेली असून शेतकरी पिक विम्याच्या रकमेपासून वंचित राहत आहे. तर राजकीय नेत्यांच्या दबावामुळे जिल्हा कृषी प्रशासन हदबल झाले असून राजकीय नेते कागदी घोडे नाचवत असल्याचा आरोप करीत शेतकरी स्वाभिमानी संघटनेने तापी पूर्णा संगम चांगदेव येथे जिल्हा प्रशासनाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विवेक सोनवणे व अन्य सहकार्यांनी पिंडदान केले.

संपूर्ण भारतामध्ये केळी उत्पादनांमध्ये जळगाव जिल्हा व तेथील केळी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील ८१ हजार ६४२ हेक्टर क्षेत्रासाठी ७७ हजार ९२० शेतकऱ्यांनी पिक विमा काढला असून दि.१८ जून २०२१ च्या शासन निर्णयानुसार पीक विम्याचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम कमी व जास्त तापमानाची हेक्टरी ६० ते ७० हजार रु. ३ आठवड्यांच्या आत,(21 ऑगस्टपर्यंत) तसेच गारपीट ,चक्रीवादळ, अतिवेगाचे वारे यांची नुकसान भरपाई पंचनामेनुसार विमा कालावधी संपुष्टात आल्यानंतर 45 (15 सप्टेंबर पर्यंत) दिवसांच्या आत पंचनाम्यानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे बंधनकारक होते.

परंतु सन 2023-24 साठी नवीन केळीसाठी पिक विमा काढण्यास सुरुवात झालेली असली तरी अजून सन 2022-23 चा पिक विमा शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाच्या संवेदनहीन भूमिकेमुळे मिळाला नाही. विशेष खेदाची बाब म्हणजे जिल्हा कृषी प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे पीक पडताळणी रखडली, जिल्ह्यातील 80 हजार हेक्टरवरील 40,000 हेक्टर ची पीक पडताळणी पूर्ण केल्यानंतर कृषी प्रशासनाने पडताळणी का बंद केली, जिल्हा कृषी प्रशासनावर कोणत्या राजकीय नेत्यांचा दबाव होता. जळगाव जिल्ह्यात कोणते बोगस केळी पिक विम्याचे लाभार्थी हे राजकीय नेत्यांचे बागलबच्चे होते असा प्रश्न शेतकरी जिल्हा प्रशासनाला विचारत आहे. त्यामुळे सन 2022-23 चा पिक विमा अजून शेतकऱ्यांना मिळालेला नसल्यामुळे चालू हंगामातील केळी पिक विमा काढावा की नाही या संभ्रमावस्थेत केळी उत्पादक शेतकरी असून शासन व प्रशासनाबद्दल शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पीक विम्यासाठी जलसमाधी आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना अंगाला केळीचे पान बांधून डोक्यावर केळीचे घड घेऊन केळीच्या पानावरती पीक विम्यासाठी निवेदन दिले. जिल्हा प्रशासनाने आठ दिवसांच्या आत केळी पिक विमा देऊ असे आश्वासन दिले परंतु आजतागायत शेतकऱ्यांच्या खात्यात केळी पिक विम्याची नुकसान भरपाई जमा झालेली नाही व जिल्हा प्रशासन व राजकीय नेते कागदी घोडे नाचवत असल्याच्या निषेधार्थ चांगदेव येथे तापी पूर्णा पवित्र संगमावर संवेदनहीन जिल्हा प्रशासनाचे पिंडदान आंदोलन करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी निषेध केला. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे प्रमोद सौंदडे, निकिता इंगळे, संजय इंगळे, छोटू पुजारी, हेमंत पाटील, श्रीराम अडायके सारंग न्हावी, धनंजय शेळके ,हेमंत पाटील, प्रदीप पाटील, संजय बोदळे आदि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news