शाळा परिसरातील पान टपर्यांवर कारवाई करण्यास भाग पाडल्यानेच नगरमधील पुरोगामी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. मात्र या घटनेने नगरमध्ये कायद्याचे राज्य आहे की नाही, पोलिसांचा धाक संपलाय का? अशा प्रश्नांना पुन्हा जन्म दिला आहे. हल्ल्यानंतर कुलकर्णी यांच्याशी पोलिस ज्या पद्धतीने वागले, ते तर त्याहून क्लेषदायक आहे. पुरोगामीत्वावर होणारे हल्ले रोखायचे असतील अन् कायद्याचे राज्य दाखवून द्यायचे असेल, तर कटपुतळ्यांचा खेळ बंद करून पोलिसांना खमकी भूमिका घ्यावीच लागेल. तरच अशा अपप्रवृत्तींना आळा बसेल अन् पोलिसांचा धाकही.
हेरंब कुलकर्णी पुरोगामी विचारांचा वारसा निर्भीडपणे चालवीत आहेत. समाजहिताची भूमिका घेऊन वाटचाल करीत आहेत. अलीकडेच ते नगर शहरात मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. येथेही त्यांनी विद्यार्थीहिताच्या उपक्रमांना प्राधान्य दिले. शाळेभोवतीच्या पानटपर्या हटविण्यास प्रशासनाला भाग पाडले. तसेही शाळेच्या शंभर मीटर अंतरात टपरीवर तंबाखूजन्य पदार्थ विक्रीला बंदी आहेच. याच रागातून कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. मात्र नसानसात भूमिका, पुरोगामीत्व भिनलेले हेरंब सर घाबणार्यापैंकी नाहीतच. हे कदाचित त्या गुंडांना किंवा त्याच्या पाठीराख्यांना माहीत नसावे. या हल्ल्याने त्यांचे मनोबल वाढून ते दुप्पट शक्तीने लढा उभारतील; मात्र या घटनेतून नगर शहरातील कायदा सुव्यवस्थेचे अन् पोलिसांच्या असंवेदनशीलतेचे धिंडवडे निघाले.
हेरंब सर ओळख लपवीत 'कॉमन मॅन' म्हणून पोलिसांना सामोरे गेले आणि फिर्याद घेण्यासाठी तोफखाना पोलिसांनी त्यांना चार तास बसवून ठेवले. दुसर्या दिवशी घटनास्थळाचा पंचनामा करतानाही हवालदाराने दोन तास बसवून ठेवले. सामाजिक संघटना आणि माध्यमांनी आवाज उठविल्यानंतर सगळी यंत्रणा खडबडून जागी झाली. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही सरांशी बोलले. खा. सुप्रिया सुळे यांनीही भेट घेऊन विचारपूस केली. आ. संग्राम जगताप, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटीलही त्यांच्या घरी पोहोचल्या. तेव्हा कुठे पोलिस यंत्रणेला घटनेचे गांभीर्य समजले. तोपर्यंत पोलिसांच्या कर्तव्याचा जो काही 'पंचनामा' व्हायचा, तो झाला. एसपी राकेश ओलाही तातडीने विचारपूस करण्यासाठी घरी पोहोचले. जिल्हा पोलिस दलाचे प्रमुख म्हणून ते झालेल्या 'पंचनाम्या'वर पांघरून घालतीलही; पण किती दिवस अशांची पाठराखण करणार? प्रत्येक वेळी एसपींनीच फिल्डवर यायचे का? स्थानिक पोलिस यंत्रणा काय करते? याचे बारकावे तपासून एसपी ओला कायद्याचा दंडुका उगारतील. त्यातून बेजबाबदार अधिकारी, कर्मचारी अन् गुंडही सुटणार नाहीत, ही अपेक्षा.
तपास होईल, आरोपी अटक होतील, मात्र पोलिसांच्या असंवेदनशीलतेचे काय? अन्यायाविरोधात न्याय मागण्यासाठी सामान्य माणसाने पोलिसांची पायरी चढावी की नाही? याबाबत जो संदेश गेला त्याचे काय? असे प्रश्न निकाली काढायचे असतील तर एसपींनीच कारवाईचा दंडुका उगारला पाहिजे.
हेरंब सरांनी अकोल्यात दोनशेच्या वर बालविवाह रोखले, दारू वाहणारी वाहने पकडून दिली. अनेक दारू दुकाने बंद करण्यास भाग पाडले. तेथे ते निडरपणे हे सगळे करू शकले; नगर शहरात मात्र त्यांना विचित्र अनुभव आला. मात्र यामुळे ते मुळीच खचणार नाहीत. उलटपक्षी ज्या पद्धतीने त्यांच्यामागे समाज उभा राहिला, त्यातून त्यांना अशा अपप्रवृत्तींच्या विरोधात लढण्याचे बळ मिळाले.
'कायद्यासमोर सर्व समान, तसे गुन्हेगारांसमोर सर्व समान' ही नवी म्हण त्यांनी आपबीती सांगताना मांडली. इतकेच काय तर हा लढा अधिक तीव्र करण्याचा मनोदय व्यक्त करताना सरांनी अब्राहम लिंकन यांच्या 'गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं, त्यांना नमवणं सर्वांत सोपं असतं!' याचा उल्लेख करत 'हल्ल्याने फरक पडणार नाही, मारणारी माणसं गेली, मी जिवंत आहे. दारूबंदी आणि अपप्रवृत्तींविरुद्धचा लढा लढणारच. काय करायचे ते करा,' असा दृढ निश्चयही त्यांनी केला. समाजबळ पाठीशी असल्याने सरांना भीतीचे कारण नाही, तसेही ते भीत नाहीतच. मिळालेले पाठबळ पाहता त्यांच्या लढ्याची नौका किनारी पोहोचल्याशिवाय राहणार नाही, हे सुनिश्चित!