Pimpri News : बॉम्बस्फोटाच्या अफवेने सोसायटीधारकांत घबराट

Pimpri News : बॉम्बस्फोटाच्या अफवेने सोसायटीधारकांत घबराट

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : रात्री अकराची वेळ… नागरिकांची दिवे मालवून झोपण्याची तयारी… तेवढ्यात अचानक कानाचे पडदे फाटतील असे मोठे स्फोट… सोसायटीधारकांत घबराट, कोणाला काहीच कळेना, सोसायट्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर भूकंपासह बॉम्ब स्फोट झाल्याचा मेसेज. त्यामुळे अबालवृद्धांनी घरातून बाहेर पडून मोकळ्या जागेचा आसरा घेतला. त्यानंतर काही वेळाने सिलिंडरचा स्फोट झाल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.

ताथवडे येथे अवैधरित्या गॅस भरत असताना सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोट इतका मोठा होता की, परिसरातील सोसायट्यांच्या दारे-खिडक्या हादरल्या. काहींच्या घरातील भांडीदेखील पडली. सुरुवातीला अनेकांना भूकंप झाल्याचा समज झाला. त्यामुळे सर्वांनी एकमेकांना फोन करून घराच्या बाहेर मोकळ्या जागेत जाण्यास सांगितले. त्यानुसार, काही मिनिटांतच नागरिक सोसायटीतील मोकळी जागा, रस्त्यावर जमा झाले. खबरदारीचे उपाय म्हणून सोसायटीतील गॅस, वीजकनेक्शन बंद करण्यात आले. अचानक झालेल्या या धावपळीमुळे लहान मुले मोठ्याने रडू लागली. ज्यामुळे पालकांची आणखी धांदल उडाली.

दरम्यान, काही वेळाने कोणीतरी जेएसपीएम कॉलेजवर दहशतवादी बॉम्ब हल्ला झाल्याची अफवा पसरवली. त्यामुळे रस्त्यावर मोकळ्या जागेत आलेले सर्व नागरिक पुन्हा घरामध्ये लपून बसले. अनेकांनी घरात जाऊन टीव्ही सुरू केले. दरम्यान, काही वेळात घटनास्थळी माध्यमांचे प्रतिनिधी पोहोचल्यानंतर खरी बातमी समोर आली. टँकरमधून गॅस भरत असताना स्फोट झाल्याचे समजताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

वीस ते पंचवीस सोसायट्यांमध्ये धावपळ

घटनास्थळापासून दोन किलोमीटर अंतरावर वीस ते पंचवीस सोसायट्या आहेत. ज्यामध्ये हजारोंच्या संख्येत नागरिक राहत आहेत. सिलिंडरच्या स्फोटानंतर पसरलेल्या अफवांमुळे या सोसायट्यांमध्ये मोठी धावपळ झाली.

लोकप्रतिनिधींची सोसायट्यांना भेट

स्फोटाची माहिती मिळताच माजी नगरसेवक राहुल कलाटे, चेतन पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सोसायटीधारकांमध्ये घबराट पसरल्याचे समजल्यानंतर त्यांनी सोसायट्यांना भेट दिली. नागरिकांना परिस्थतीत समजावून सांगत शांत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर सोसायट्यांच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

स्फोटाच्या आवाजांमुळे सोसायटीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुरुवातीला भूकंप, बॉम्ब स्फोटाच्या अफवा पसरल्याने सर्वजण तणावात होते. सोसायटीधारक एकत्र जमले होते. दरम्यान, गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याचे समजल्यानंतर सर्वजण घरात गेले.

-प्रवीण फराड, सोसायटीधारक, ताथवडे

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news