जळगाव : पुढारी ऑनलाइन डेस्क
जामनेर तालुक्यातील नांद्रा येथील गावात वारंवार वाद घालणाऱ्या मुलाला पित्यासह भावाने रागावून समजावून गावात भांडण करत जाऊ नकोस असे सांगत कानशिलात मारली. याचा राग येऊन भांडखोर मुलाने वडीलासह भावाचीही हत्या करण्याच्या दुहेरी हत्याकांडाचा न्यायालयात निकाल लागला. ११ जुलै २०२० रोजी घडलेल्या या हत्याकांडामधील आरोपीस जन्मठेपेसह ५ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.
जामनेर तालुक्यातील नांद्रा येथे ११ जुलै २०२० रोजी आरोपी निलेश आनंदा पाटील याचे गावातील पांडूरंग हिरामण सोनवणे यांच्याशी वाद झाला होता. हा वाद झाल्यानंतर निलेशचे वडिल आनंदा कडू पाटील व निलेशचा भाऊ महेंद्र पाटील यांनी निलेशला समजावून सांगितले की, गावात भांडण करत जाऊ नकोस तसेच वडिलांनी निलेशला २-४ चापटा देखील मारत समजावून घरी आणले. याचा राग मनात धरत रात्री ११ वाजता निलेशने झोपेत असलेल्या वडिलांचे तोंड दाबले. निलेशने वडिलांना चाकूने भोसकल्याने त्यांच्या तोंडातून रक्त निघत होते. निलेशच्या हातात चाकू होता. वडिलांना वाचविण्यासाठी महेंद्र निलेशला धरण्यासाठी गेला असता निलेशने तोच चाकू भाऊ महेंद्रच्या पोटात खुपसला. त्यामुळे महेंद्र खाली पडला. तोच चाकू घेऊन निलेश वहिनी अश्विनीच्या (महेंद्रची पत्नी) अंगावर धावून गेला. मात्र अश्विनीने घरात जावून घराचा दरवाजा बंद केल्याने त्या वाचल्या होत्या. याप्रकरणी महेंद्र याची पत्नी अश्विनी हिने दिलेल्या फिर्यादीवरुन पहुर पोलीसात दुहेरी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी मयत वडील आनंदा पाटील यांची पत्नी सरस्वतीबाई पाटील यांची साक्ष या खटल्यात महत्वाची ठरली. सरस्वतीबाई पाटील यांनी न्यायालयात, झालेली घटना सविस्तर सांगितली. त्यांच्यासह इतर १३ जणांच्या साक्षी महत्याच्या ठरल्या. हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.क्यु.एस.एम. शेख यांच्या न्यायालयात चालला. फिर्यादीपक्षा तर्फे आलेल्या एकूण १३ साक्षीदार जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी तपासले. सरकारपक्षातर्फे सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले. युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयासमोर आलेला पुरावा लक्षात घेवून न्यायालयाने आरोपी निलेश पाटील याला कलम ३०२ अन्वये आरोपी जन्मठेपेची शिक्षा व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
हेही वाचा: